नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सरकार स्थापन केलं आहे. मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. मोदींच्या शपथविधीनंतर त्यांना जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी शुभेच्छा दिल्या तसेच अभिनंदन केलं. तर मोदींनी स्वतःहून अनेक नेत्यांशी संवाद साधला. मोदी यांनी तैवानचे राष्ट्रपदी लाई चिंग ते यांच्याशी देखील बातचीत केली. लाई चिंग ते यांनी मोदी यांचं तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केलं. दरम्यान, भारत आणि तैवानमधील संबंध दृढ होत असल्याचं पाहून भारताचं शेजारील राष्ट्र चीनचा जळफळाट झाला आहे.

एका मुलाखतीत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी मोदी आणि लाई चिंग ते यांच्यामधील संवादावर प्रतिक्रिया दिली. माओ निंग म्हणाले, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, तैवानमध्ये राष्ट्रपती नावाची कोणतीही गोष्ट (पद) अस्तित्वात नाही. चीन तैवानचे अधिकारी आणि चीनशी राजकीय संबंध असलेल्या देशांमधील कोणत्याही प्रकारच्या संवादाचा, संभाषणाचा विरोध करतो.

चीनकडून आलेल्या या वक्तव्यावर तैवाननेही जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. तैवानचे उपपरराष्ट्रमंत्री टी. एन. चुंग-क्वांग यांनी चीनच्या प्रतिक्रियेचा निषेध नोंदवत म्हटलं आहे की मला वाटतं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे राष्ट्रपती (लाई चिंग ते) या लोकांना (चीन) घाबरणार नाहीत.

तत्पूर्वी तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं की, दोन्ही नेत्यांनी (लाई चिंग ते आणि नरेंद्र मोदी) सौहार्दपूर्ण संभाषण केलं. परंतु, या संवादावर चीनने आक्षेप घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. धमक्या देऊन कधीच मैत्री होत नाही. तैवान भारताबरोबरची भागीदारी वाढवण्यासाठी, ती अधिक दृढ करण्यासाठी कटीबद्ध आहे. हे संबंध एकमेकांचा लाभ आणि मूल्यांवर आधारित आहेत.

हे ही वाचा >> India Nuclear Power : अण्वस्त्रांच्या बाबतीत भारताची पाकिस्तानवर सरशी, चीननेही ताफा वाढवला

तैवानचे राष्ट्रपती लाई चिंग ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करणारी एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आहे, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन, आपण मिळून भारत आणि तैवानची भागीदारी आणखी वाढवुया. व्यापार, उद्योग आणि इतर क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्याने आणखी पुढे जाऊ. आपल्या भागीदारीचा विस्तार करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारताबरोबर हिंद आणि पॅसिफिक भागात शांती, समृद्धीसाठी योगदान देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.