भारतीय जनता पक्षाचे नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. प्रक्षोभक वक्तव्य करणे, शत्रुत्व वाढवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे या आरोपाखाली पोलिसांनी बग्गा यांच्यावर ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. सीएम केजरीवाल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर बग्गा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. तजिंदरपाल सिंग बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. आपचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनीही बग्गा यांच्या अटकेवरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धडा देत केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

कुमार विश्वास यांनी ट्विटरवर लिहिले की, “प्रिय धाकटा भाऊ भगवंत मान, ३०० वर्षात पंजाबने दिल्लीच्या कोणत्याही असुरक्षित हुकूमशहाला आपल्या पराक्रमाशी खेळू दिले नाही. पंजाबने हा मुकुट तुमच्याकडे सोपवला आहे, कोणत्या बुटक्या दुर्योधनाच्या हाती नाही. पंजाबच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशाचा आणि पोलिसांचा अपमान करू नका. पगडी संमभाल जट्टा!”

भाजपा नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांना शुक्रवारी सकाळी पंजाब पोलिसांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. त्यानंतर भाजपाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. या अटकेप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बग्गा यांना अटक करण्यासाठी आलेल्या पंजाब पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, बग्गा यांना अटक करून पंजाबला घेऊन जाणारा पोलिसांचा ताफा हरयाणा पोलिसांनी कुरुक्षेत्रात अडवला. पंजाब पोलिसांच्या ताफ्याला हरयाणामध्ये रोखल्यानंतर भाजपा नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना दिल्लीत परत नेण्यात आले आहे.