पीटीआय, नवी दिल्ली

देशात सध्या उष्णतेची लाट असून, गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणी आग आणि विद्याुत सुरक्षा तपासणी मोहीम नियमित राबवण्याचे आदेश दिले. या वेळी मोदी यांनी ईशान्येकडील राज्यात रेमल चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन सरकारच्या आगामी १०० दिवसांच्या कार्यपद्धतीचा आढावाही घेतला.

लोकसभा निवडणुकीचे ‘एग्झिट पोल’ शनिवारी जाहीर झाले. त्यात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ‘एग्झिट पोल’च्या अंदाजानंतर मोदी यांनी रविवारी देशातील काही भागांतील उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतल्याचे अधिकाऱ्यांनी निवेदनातून सांगितले.

हेही वाचा >>>अरविंद केजरीवाल पुन्हा तिहारमध्ये; अंतरिम जामिनाची मुदत संपल्यानंतर शरणागती

आगीच्या घटना रोखण्यासाठी तपासणी मोहिमा नियमित राबवणे आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले. जंगलात अग्निशमन रेषा राखण्यासाठी नियमित तपासणी आणि बायोमासचा उत्पादक वापर करण्याचे नियोजन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘रेमल’ चक्रीवादळानंतर ईशान्येकडील मिझोरम, आसाम, मणिपूर, मेघालया, त्रिपुरा आदी राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील परिस्थितीची माहिती पंतप्रधान मोदींना या वेळी देण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) पूरग्रस्त भागात नागरिकांचे बचावकार्य करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान, या राज्य सरकारांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन मोदींनी या वेळी दिले.