Talaq-e-Hasan Legal Challenges India: मुस्लिम समुदायातील तलाक-ए-हसन या घटस्फोटाच्या प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने, “एका सुसंस्कृत समाजाने अशा प्रकारची प्रथा मान्य करावी का?” असा सवाल केला आहे.

“हा नक्की काय प्रकार आहे? २०२५ मध्ये तुम्ही अशा गोष्टींना प्रोत्साहन कसे देता? आपण सर्वोत्तम धार्मिक प्रथेचे पालन करतो, त्यामध्ये याचा समावेश आहे का? अशा प्रकारे महिलांची प्रतिष्ठा राखली जाते का? एका सुसंस्कृत समाजाने अशा प्रकारच्या प्रथेला मान्यता द्यावी का?” असे कठोर प्रश्न तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे प्रमुख न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विचारले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासह न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांचा समावेश आहे. पत्रकार बेनझीर हीना यांच्या अशा प्रकारच्या घटस्फोटाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी वरील प्रश्न उपस्थित केले.

पत्रकार बेनझीर हीना यांनी खंडपीठासमोर असा युक्तिवाद केला की, ही प्रथा अतार्किक, मनमानी आणि संविधानाच्या कलम १४, १५, २१ आणि २५ चे उल्लंघन करणारी आहे. न्यायालयाने म्हटले की, जेव्हा एखादा मुद्दा मोठ्या प्रमाणात समाजावर परिणाम करतो तेव्हा न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागू शकतो.

यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, न्यायालय हा प्रश्न पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे पाठवू शकते. त्यांनी संबंधित पक्षांना या प्रकरणात कोणते मुद्दे उद्भवू शकतात याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

बेनझीर हीना यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले की, त्यांच्या पतीने ज्या पद्धतीने घटस्फोट (तलाक-ए-हसन) दिला आहे, त्यावरून बेनझीर हीना यांना त्या घटस्फोटित आहेत हे सिद्ध करता येत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, हुंड्याच्या मागणीवरून घटस्फोट झाला होता.

वकिलांनी पुढे सांगितले की, “तलाक-ए-हसन घटस्फोटामुळे बेनझीर हीना यांना त्यांच्या मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठी अडचणी येत आहेत. त्या घटस्फोटित आहेत असे सिद्ध करणारी कागदपत्रे नसल्याने शाळा त्यांची कागदपत्रे स्वीकारत नाही. त्यामुळे मुलाला शाळेत प्रवेश मिळत नाही.”

तलाक-ए-हसन म्हणजे काय?

पीटीआयच्या वृत्तानुसार, ‘तलाक-ए-हसन’ हा मुस्लिम समुदायातील घटस्फोटाचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये पती तीन महिन्यांच्या कालावधीत पत्नीला दर महिन्याला एकदा ‘तलाक’ हा शब्द उच्चारून विवाह रद्द करू शकतो. तलाक-ए-हसनमध्ये, जर या कालावधीत पती आणि पत्नीने पुन्हा एकत्र राहणे सुरू केले नसेल, तर तिसऱ्या महिन्यात ‘तलाक’ हा शब्द तिसऱ्यांदा उच्चारल्यानंतर घटस्फोट झाला असे मानले जाते.