अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पैशांची सतत चणचण भासणाऱ्या तालिबानने चुकून त्यांच्या शत्रू देशाला मोठी रक्कम हस्तांतरित केली आहे. त्यानंतर आता तो देश तालिबानला हे पैसे परत करण्यास नकार देत आहे. अशा परिस्थितीत आधीच गरिबीशी झुंजत असलेल्या तालिबानसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. तालिबान अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांकडे त्यांची गोठलेली बँक खाती पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत. खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान तालिबानचे ब्रँड अॅम्बेसेडर बनून परदेशातून देणग्या मागत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तालिबानचा हा शत्रू देश दुसरा कोणी नसून त्याचा शेजारी ताजिकिस्तान आहे. तालिबान राजवटीने चुकून सुमारे ८ लाख डॉलर्स ताजिकिस्तानमधील अफगाण दूतावासाच्या बँक खात्यात हस्तांतरित केले. चूक लक्षात आल्याने तालिबानने त्यांच्या दूतावासाला आणि ताजिक सरकारकडे पैसे परत करण्याची मागणी केली, ती नाकारण्यात आली. अफगाण दूतावासातील राजदूतांनी सुरुवातीपासूनच पदच्युत अश्रफ घनी सरकारशी निष्ठा व्यक्त केली आहे आणि तालिबानला कडाडून विरोध केला आहे.

दुशान्बेच्या न्यूज वेबसाइट अवेस्ताने गेल्या आठवड्यात दूतावासाच्या सूत्रांचा हवाला देऊन अहवाल दिला होता की, ताजिकिस्तानमधील निर्वासित मुलांसाठी शाळेला निधी देण्यासाठी अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या सरकारने पैसे मंजूर केले होते. तथापि, मध्यंतरी तालिबानचे हल्ले वाढल्यामुळे, अफगाण सरकार हे पैसे हस्तांतरित करू शकले नाही आणि १५ ऑगस्टपासून तालिबानने काबूलवर कब्जा केला.

हे पैसे पूर्वनियोजित तारखेला हस्तांतरित करण्यात आल्याचे अवेस्ताच्या अहवालात सांगण्यात आले आहे. ताजिकिस्तानला जाणारा पैसा तालिबानच्या अर्थमंत्रालयाला अगोदरच माहीत होता, असे कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत. युरेशिया नेट या न्यूज वेबसाइटने दावा केला आहे की तालिबान राजवटीतून निधी प्रत्यक्षात हस्तांतरित केला गेला आहे, परंतु तो फक्त चार लाख डॉलर्स आहे. हा व्यवहार यावर्षी सप्टेंबर महिन्यात झाला होता.

दूतावासाच्या सूत्राने सांगितले की तालिबान सरकारने नोव्हेंबरमध्ये त्यांना पत्र लिहून पैसे परत करण्यास सांगितले होते. मात्र ही विनंती फेटाळण्यात आली आहे. सूत्राने सांगितले की, आम्ही शाळा बांधलेली नाही, मात्र आता चार महिन्यांपासून शिक्षक आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना या निधीतून पगार मिळत आहे. हा सगळा पैसा दूतावास आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या गरजांवर खर्च केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban accidentally wires money to tajikistan embassy of afghanistan vsk
First published on: 21-12-2021 at 18:37 IST