अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष कमी झालेला नाही तर वाढला आहे. तालिबानने आता एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद या ठिकाणी ड्रोन हल्ला केला आहे. तसंच इतर ठिकाणांनाही लक्ष्य केलं आहे. तालिबानने हा दावा केला आहे की पाकिस्तानच्या लष्करी तळांवर आणि हवाई तळांवर आम्ही हल्ला केला आहे. तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे की त्यांनी रावळपिंडीच्या नूर खान एअर बेसवर, बलुचिस्तानच्या क्वेटा येथील १२ व्या डिविजनच्या मुख्यालयावर आणि खैबर पख्तुनवा येथील मोहम्मद एजन्सीच्या ख्वाजाई कँप सह मुख्य लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे.

तर आम्ही आणखी हल्ले करणार, तालिबानचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानने आमच्या हवाई सीमेचं उल्लंघन केलं तर आम्ही आणखी तिखट उत्तर देऊ असंही तालिबानने स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानने काबूलच्या जवळ असलेल्या बगराम हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही आज केलेला ड्रोन हल्ला हे त्याचंच उत्तर आहे. आमच्या राजधानीत बंदूक हल्ला करण्यात आला होता. तसंच काही भागांमध्ये स्फोटांचे आवाजही आले होते. हवाई हल्ला तर रोखण्यात आम्ही यशस्वी झालो होतो आता त्या कारवाईला उत्तर म्हणून आम्ही ड्रोन हल्ले केले आहेत असं तालिबानने स्पष्ट केलं आहे.

पाकिस्तानचे ३२ सैनिक मारले गेल्याचा तालिबानचा दावा

अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी शनिवार आणि रविवार अशा दोन दिवशी पाकिस्तानने काबूल आणि बगराम तसंच इतर भागांमध्ये बॉम्बहल्ले केले. त्यांना उत्तर म्हणून आम्ही ड्रोन हल्ला केले आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानचे ३२ सैनिक मारले गेले आहेत अशी माहिती आहे असा दावा टोलो न्यूजने केला आहे.