अहमद मसूद, सालेह यांच्या फौजा पराभूत

काबूल : काबूलच्या उत्तरेकडील पंजशीर प्रांतावरही ताबा मिळवल्याचे तालिबानने सोमवारी सांगितले. तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले, परंतु पंजशीर खोरे मात्र तालिबानविरोधी दलांच्या ताब्यात होते.

पंजशीरमध्ये तालिबानविरोधी दले तालिबानी सैन्याला कडवा प्रतिकार करीत होती. पण अखेर तालिबानने त्यांचा पराभव करून पंजशीरमधील आठ जिल्हे ताब्यात घेतले. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सोमवारी पंजशीरवर नियंत्रण मिळवल्याची माहिती दिली. आमचा देश आता पूर्णपणे युद्धाच्या बाहेर पडला आहे, असेही त्याने सांगितले. पंजशीरमधील नागरिक सुरक्षित राहतील, यात शंका नाही, अशी ग्वाहीही त्याने दिली. मात्र, तालिबानी सैनिक अत्याचार करतील या भीतीने अनेक कुटुंबे डोंगराळ भागात पळून गेली आहेत, असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

तालिबानविरोधी दलांचे नेतृत्व अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि तालिबानविरोधक अहमद शहा मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करीत होते. अमेरिकेतील ११ सप्टेंबरच्या हल्ल्याच्या काही दिवस आधी तालिबान्यांनी अहमद शहा मसूद यांची हत्या केली.

हिंदुकुश पर्वतराजीत असलेल्या पंजशीर प्रांतात तेथील सैनिकांनी १९८० मध्येही सोव्हिएत फौजांविरोधात असाच लढा दिला होता. त्यानंतर अहमद शहा मसूद यांच्या नेतृत्वाखाली तेथील फौजांनी पंजशीर आपल्या ताब्यात ठेवला होता. अहमद शहा मसूद यांच्या हत्येनंतर त्यांचा पुत्र अहमद तालिबानविरोधी दलांचे नेतृत्व करीत होता. आम्ही प्रांत राखण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले, असे अहमद याने रविवारी म्हटले होते.

पंजशीरमधील तालिबानविरोधी मसूद याच्या सैन्याने शस्त्रे खाली ठेवली आहेत. तालिबानने शस्त्रसंधीच्या अटीवर तेथील लढाई थांबवली. त्यानंतर तालिबानी सैनिकांची शेकडो वाहने पंजशीर खोऱ्यात दाखल झाली.

अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष सालेह यांनी अध्यक्ष अशरफ घनी पळून गेल्यानंतर त्यांनी स्वत:ला हंगामी अध्यक्ष जाहीर केले होते. त्यानंतर घनी यांचे कार्यालय आणि राजप्रासाद तालिबानने ताब्यात घेतला होता.

नागरिकांचे पलायन

पंजशीरमधील नागरिक सुरक्षित राहतील, अशी ग्वाही तालिबानने दिली असली तरी तालिबान्यांचा इतिहास पाहता ते अत्याचार करतील या भीतीने अनेक कुटुंबे डोंगराळ भागात पळून गेल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.