तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला बारादर हा अफगाणिस्तानमधील सरकारचं नेतृत्व करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच केली जाणार आहे. तालिबानशीसंबंधित असणाऱ्या सुत्रांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. सध्या अफगाणिस्तानमधील आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची झाली असून लवकरात लवकर सत्ता स्थापन करुन आर्थिक घडी बसवण्याचं आव्हान तालिबानसमोर आहे.

बारादर हा तालिबानच्या राजकीय कार्यालयाचं नेतृत्व करतो. बारादरबरोबरच मुल्ला मोहम्मद याकूबकडेही मुख्य जबाबदारी दिली जाणार आहे. मुल्ला मोहम्मद याकूब हा तालिबानचा सह-संस्थापक असणारा पण काही वर्षापूर्वीच मरण पावलेल्या मुल्ला ओमरचा मुलगा आहे. मोहम्मद अब्बास स्टानिकजईलाही सरकारमध्ये वरिष्ठ पद दिलं जाणार असल्याची माहिती समोर आलीय. “तालिबानचे सर्व वरिष्ठ नेते काबूलमध्ये दाखल झाले आहेत. नवीन सरकारची घोषणा करण्याच्या अंतिम टप्पातील चर्चा सुरु आहेत,” असं तालिबानच्या सुत्रांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

नक्की वाचा >> RSS हे भारतामधील तालिबानी, धर्माच्या नावावर देशात फूट पाडतात; RJD च्या नेत्याची टीका

तालिबानने १६ ऑगस्ट रोजी काबूलमधील राष्ट्राध्यक्षांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करत संपूर्ण देशावर ताबा मिळवला. सध्या तालिबान पंजशीरच्या खोऱ्यात नॉर्दन अलायन्सशी संघर्ष करत असून हा प्रदेश वगळता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानचाच ताबा आहे. या ठिकाणी नॉर्दन अलायन्स आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या फौजांमध्ये युद्ध सुरु आहे. अमेरिकन फौजांनी देशामधून काढता पाय घेतल्यानंतर मंगळवारपासून हा संघर्ष अधिक तीव्र झालाय. या दोन्ही गटांमध्ये वाटाघाटीचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे.

नक्की वाचा >> “कदाचित माझ्या मुलाच्या ‘त्या’ इच्छेसाठी मी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला असावा”; बायडेन यांचं भावनिक वक्तव्य

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नवीन मंत्रीमंडळ बनवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. सर्व सहकारी गटांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी तालिबानला किमान दोन तीन दिवसांचा अवधी लागणार आहे. . तालिबानचे सांस्कृतिक आयोगाचे सदस्य बिलाल करीमीने संघटनेचा प्रमुख नेता हिबतुल्लाह अखुंदजादाच्या नेतृत्वाखाली यासंदर्भातील चर्चा होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नवीन सरकारमध्ये पवित्र आणि सुशिक्षित लोकांचा समावेश असे आणि मागील २० वर्षांपासून सरकारमध्ये असणाऱ्यांना संधी दिली जाणार नाही, अशी माहिती कतारमध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजईने दिलीय. विशेष म्हणजे सरकारमध्ये महिलांनाही स्थान दिलं जाईल असंही अब्बास स्टानिकजाईने स्पष्ट केलंय. सरकार हे संघटनेचा प्रमुख नेता हिबतुल्लाह अखुंदजादाच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे संकेत तालिबानने दिले होते. मात्र अखुंदजादा हा केवळ नामधार नेता असला तरी दैनंदिन कारभार मुल्ला बारादरकडे असणार आहे अशी माहिती समोर येतेय.

नक्की वाचा >> तालिबानचं अभिनंदन करताना ‘अल-कायदा’ने केला काश्मीरचा उल्लेख; म्हटलं, “इतर इस्लामिक प्रदेशही…”

पाजव्होक या अफगाणिस्तानमधील वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार तालिबानने सखउल्लाहकडे कार्यवाहक शिक्षा प्रमुख. अब्दुल बाकीला उच्च शिक्षण कार्यवाहक प्रमुख, सदर इब्राहिमला कार्यवाहक गृहमंत्री, गुल आगाला वित्तमंत्री, मुल्ला शिरीनला काबूलचा राज्यपाल, हमदुल्ला नोमानीला काबूलचा महापौर आणि नजीबुल्लाहला गुप्तहेर संघटनेचा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली जाणार आहे. यापूर्वी तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदला संस्कृति आणि सूचना मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलंय.