एकीकडे पाकिस्तान जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी तालिबानचं कौतुक करताना दिसत आहे तर दुसरीकडे एक वेगळंच चित्र समोर आलं आहे. तालिबान सरकार आणि तालिबान्यांकडून पाकिस्तानला फारसं महत्व दिलं जात नसल्याची चर्चा एका व्हिडीओनंतर पुन्हा सुरु झालीय. आपल्यावर कोणाचाही दबाव नसून आपण स्वतंत्र आहोत हे दाखवून देण्यासाठी तालिबान्यांनी पाकिस्तानचा झेंडा तोडलाय. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानमधून मदतीचं सामान घेऊन येणाऱ्या ट्रकवर असणारा पाकिस्तानी झेंडा तालिबान्यांनी ट्रकला देशात प्रवेश देण्याआधी तोडल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. इतकच नाही तर झेंडा तोडल्यानंतर या तरुणांनी घोषणाबाजीही केलीय.

व्हायरल झालेलेया व्हिडिओमध्ये एक ट्रक अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबताना दिसतो. या ट्रकच्या पुढील भागावर लावलेल्या बॅनरवर अफगाणिस्तान पाकिस्तान असं लिहिलेलं आहे. या ट्रकच्या पुढील भागी उजव्या बाजूला पाकिस्तानचा झेंडा लावलेला होता. मात्र हा झेडा पाहून तालिबानी संतापले. त्यांनी हा झेंडा का लावलाय असा आक्षेप घेतला आणि तालिबान्यांचा एक गट या ट्रकजवळ आरडाओरड करत आला. त्यानंतर त्यांनी हा झेंडा तोडून काढला आणि कॅमेरासमोरच तो फाडला. त्यानंतर एक तालिबानी या ट्रक चालकाला धमकी देतानाही दिसला. विशेष म्हणजे ज्या ट्रकवरील झेंडा तालिबान्यांनी तोडला तो ट्रक पाकिस्तानमधून मदतीचं साहित्य घेऊन अफगाणिस्तानमध्ये येत होता. पाकिस्तान अफगाणिस्तान को ऑप्रेशन फोरम असं या ट्रकच्या पुढील बाजूस लावलेल्या बॅनरवर लिहिलं होतं.

एका दिवसापूर्वीच तालिबाने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं होतं. पाकिस्तान किंवा इतर कुठल्याही देशाला आमच्या देशातील सरकारसंदर्भात कोणती मागणी करण्याचा काही अधिकार नसल्याचं तालिबानने म्हटलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेजारी देश असणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार असावं अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र हे वक्तव्य तालिबानला फारसं पटलं नाही. तालिबानचे प्रवक्ते आणि उपसूचना मंत्री जबीउल्लाह मुजाहिद यांनी डेली टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये, “पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला यासंदर्भात बोलण्याचा काहीच अधिकार नाहीय,” असं म्हटलं होतं.

तालिबानमध्ये मुल्ला बरादर आणि मुल्ला यूसुफ यांच्या नेतृत्वाखालील गटाला पाकिस्तानचा वाढता हस्ताक्षेप नकोसा झालाय. त्यामुळेच अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक अमीरात सरकारच्या घोषणेनंतर येथील या दोन प्रमुख गटांनी सत्ताकेंद्र असणाऱ्या काबूलपासून दूर राहणं पसंत केलं आहे.