अफगाणिस्तान शेजारी राष्ट्रांकडून हवाई हल्ल्यांमार्फत होणारी घुसखोरी सहन करणार नाही असं असा इशारा तालिबानने पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानकडून करण्यात येत असलेल्या हवाई हल्ल्यांचा अफगाणिस्तानने निषेध केला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात कुनर आणि खोस्त प्रांतातील डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा तालिबानचा दावा आहे.

पाकिस्तानने मात्र अद्याप अफगाणिस्तानात झालेल्या हवाई हल्ल्यांप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आपण एकमेकांचे बंधू असल्याचं पाकिस्तान म्हणत आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे की, “आम्ही सध्या जगाकडून आणि शेजारी राष्ट्रांकडून अनेक समस्या आणि आव्हानांना सामोरं जात आहोत. कुनर प्रांतात झालेली घुसखोरी याचं स्पष्ट उदाहरण आहे”.

“आम्ही घुसखोरी सहन करु शकत नाही. आम्ही हल्ला सहन केला आहे. देशहितामुळे आम्ही तो सहन करत आहोत, पण पुढच्या वेळी सहन केलं जाणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी, पाकिस्तान शांतता प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तानसोबत दीर्घकालीन संबंधांची अपेक्षा ठेवत असल्याचं सांगितलं.

“पाकिस्तान आणि अफगाणिस्तान एकमेकांचे बंधू आहेत. दोन्ही देशातील सरकार आणि लोक दहशतवादाला मोठा धोका मानतात आणि दीर्घकाळ याचा त्रास सहन केला आहे. त्यामुळे, सीमेपलीकडील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि त्यांच्या भूमीवरील दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्याकरिता सहकार्य करण्यासाठी दोन्ही देशांनी संबंधित संस्थात्मक माध्यमांद्वारे अर्थपूर्ण रीतीने सहभाग नोंदवणं महत्त्वाचं आहे,” असं ते म्हणाले आहेत.

तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या आठवड्यात पाकिस्तानच्या राजदूतांशी संपर्क साधत हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवला होता. पाकिस्तानच्या लष्करी हेलिकॉप्टरमधून कऱण्यात आलेल्या हल्लायत ३६ लोकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक सांगत आहेत. तर युएनच्या लहान मुलांच्या संस्थेने २० मुलांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.