अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर जागतिक दहशतवादासाठी होता कामा नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तसेच त्या देशात सर्वसमावेशक सरकार स्थापन होणे गरजेचे आहे, असे भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक जाहीरनाम्यात म्हटले आहे. भारत, रशिया, इराण व इतर पाच मध्य आशियायी देशांनी या उद्दिष्टांवर सामुदायिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

भारताने बुधवारी एनएसए स्तरावर इतर सात देशांसोबत बैठक घेतली, तर आज पाकिस्तानमध्ये एक बैठक होणार आहे, ज्यामध्ये तालिबानच्या प्रतिनिधीचाही समावेश आहे. मात्र, आता तालिबानने नवी दिल्लीतील बैठकीमुळे प्रदेशात शांतता आणि स्थैर्य आणण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी न्यूज १८ला सांगितले की, तालिबान या बैठकीला सकारात्मक घडामोडी म्हणून पाहतो आणि आशा करतो की याने अफगाणिस्तानात शांतता आणि स्थिरता आणण्यास मदत होईल.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली भारताने बुधवारी इतर सात देशांशी चर्चा केली. इराण, रशिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीसाठी भारताने चीन आणि पाकिस्तानलाही निमंत्रित केले होते, मात्र दोन्ही देशांनी बैठकीला नकार दिला.

अफगाणिस्तानबाबत अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ठरला ‘दिल्ली प्लॅन’

“तालिबान त्यांच्या देशात शांतता आणि स्थैर्य आणण्यास मदत करणाऱ्या, नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या आणि देशातील गरिबी हटवण्यात मदत करणाऱ्या कोणत्याही उपक्रमाला पाठिंबा देणार आहे, असे सुहेल शाहीन म्हणाले.

“जर त्यांनी सांगितले असेल की ते अफगाणिस्तानच्या लोकांसाठी देशाची पुनर्रचना, शांतता आणि स्थिरता यासाठी काम करतील, तर हेच आमचे उद्दिष्ट आहे. अफगाणिस्तानच्या लोकांना शांतता आणि स्थैर्य हवे आहे कारण त्यांनी गेल्या काही वर्षांत खूप त्रास सहन केला आहे. सध्या आम्हाला देशातील आर्थिक प्रकल्प पूर्ण करायचे आहेत आणि नवीन प्रकल्प सुरू करायचे आहेत. तसेच आपल्या लोकांना नोकऱ्या हव्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकीत जे मुद्दे मांडले गेले त्याच्याशी आम्ही सहमत आहोत,” असे शाहीन म्हणाले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल यांची चर्चा

अफगाणिस्तानातील सध्याच्या घडामोडी पाहता त्याचा परिणाम शेजारी देशांवर व तेथील लोकांवर होणार आहे,असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटले आहे. बुधवारी अफगाणिस्तान प्रश्नावर आठ देशांची बैठक भारताने आयोजित केली होती. त्या वेळी अध्यक्षपदावरून बोलताना डोभाल यांनी सांगितले, की अफगाणिस्तानातील प्रश्नावर या भागातील देशांनी चर्चा, सहकार्य व समन्वय या मुद्द्यांवर एकत्र येण्याची गरज आहे. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर मूलतत्त्ववाद वाढून अमली पदार्थांची तस्करी होण्याचा धोका वाढला आहे. डोभाल यांनी सांगितले,की अफगाणिस्तानशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असले तरी यात प्रादेशिक शेजारी देशांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे या बैठकीतील चर्चा ही फलदायी ठरेल अशी आशा आहे. ही सल्लामसलतीची वेळ असून आम्ही जी चर्चा केली ती फलदायी आहे. त्यातून अफगाणिस्तानातील लोकांनाही लाभ होणार आहे. सामूहिक व सर्वंकष सुरक्षा वाढणार आहे.