पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातला तणाव थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. काबूलमध्ये पाकिस्तानने एका रुग्णालयावर एअर स्ट्राईक केला आहे. ज्यामुळे ४०० लोक ठार झाले आहेत तर २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानने मात्र तालिबानचा हा दावा फेटाळला आहे. अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते शराफत जमान यांनी सांगितलं की काबुल या ठिकाणी नशामुक्ती केंद्र असलेल्या एका रुग्णालयावर हल्ला करण्यातआला. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानने आरोप फेटाळला

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते मोशर्रफ जैदी यांनी अफगाणिस्तानचे आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत असं म्हटलं आहे. पाकिस्तानने जो एअर स्ट्राईक केला तो अचूक होता. आम्ही तिथल्या लष्करी तळांवर आणि दहशतवादी मोड्युलवर हल्ला केला, आम्ही सामान्य लोक जिथे राहतात तिथे कुणालाही लक्ष्य केलं नाही.

घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु

तालिबानच्या माहितीनुसार रात्री ९ च्या सुमारास पाकिस्तानकडून हा हवाई हल्ला करण्यात आला. रुग्णालयावर बॉम्ब टाकला गेल्याने ४०० लोक ठार झाले आहेत. तर २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं आणि मृतदेह ताब्यात घेण्याचं काम चाललं आहे अशी माहिती या पथकाने दिली. घटनास्थली अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. दुसरीकडे या प्रकरणी पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत. आम्ही हा हल्ला केलेलाच नाही आम्ही जो एअर स्ट्राईक केला तो दहशतवादी तळांवर केला सामान्य नागरिकांना आम्ही ठार केलं नाही असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर झाले व्हायरल

अफगाणिस्तान सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार ज्या रुग्णालयावर हल्ला करण्यात आला ते दोन हजार खाटांचं सुसज्ज रुग्णालय होतं. अशा पद्धतीने रुग्णालयावर हल्ला केला जाणं आणि सामान्य नागरिकांचा जीव घेणं ही बाब अतिशय निंदनीय आहे. असंही अफगाणिस्तानच्या प्रवक्त्यांनी म्हटलंं आहे. तसंच पाकिस्तानने हे वृत्त नाकारलं असलं तरीही स्फोटाचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ आणि धुराचे लोट हे दिसून येत आहेत.

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान संतापला

पाकिस्तानने केकेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू राशिद खानने संताप व्यक्त केला आहे. काबुलमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे मला खूप दुःख झाले आहे. जाणूनबुजून किंवा चुकून, नागरिकांची घरे, शैक्षणिक सुविधा किंवा वैद्यकीय पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे हा गुन्हा आहे. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात मानवी जीवनाची केलेली अवहेलना ही वेदनादायक आणि चिंताजनक आहे. यामुळे केवळ फूट आणि द्वेष निर्माण होईल. मी संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवाधिकार संस्थांना या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचे आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्याचे आवाहन करतो. या कठीण काळात मी माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे, अशी पोस्ट राशिद खानने केली आहे.

हमिद करझाईंची प्रतिक्रिया काय?

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमिद करझाई यांनी काबुलमधील निवासी भागांवर आणि लष्करी नसलेल्या लक्ष्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. करझाई यांनी नमूद केले की, या हल्ल्यांमुळे नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला असा इशारा दिला की, अशा प्रकारचे हल्ले सुरू ठेवल्याने पाकिस्तानला आपली उद्दिष्टे साध्य करता येणार नाहीत; उलट, परिस्थिती अधिकच बिघडेल आणि त्याचे परिणाम अंतिमतः पाकिस्तानलाच भोगावे लागतील.