“आमच्यासाठी पाकिस्तान दुसरे घर आहे. आम्ही त्यांच्यासोबत व्यापार आणि सामरिक संबंध अधिक दृढ करण्याचे वचन दिले आहे,” असे तालिबानचे प्रवक्ते झबिहउल्लाह मुजाहिद यांनी बुधवारी म्हटलंय. तसेच तालिबानला भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असंही ते म्हणाले. “अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमा लागून आहेत. धर्माच्या बाबतीतही आम्ही पारंपारिकपणे जोडलेलो आहोत. दोन्ही देशांचे लोक एकमेकांमध्ये मिसळले आहेत. त्यामुळे आम्ही पाकिस्तानसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहोत,” असे मुजाहिद यांनी पाकिस्तानमधील एआरवाय न्यूजला  दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले.

अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी तालिबानच्या आक्रमणामध्ये पाकिस्तानची कोणतीही भूमिका नाही. पाकिस्तानने कधीही आमच्या कामात हस्तक्षेप केला नाही, असेही मुजाहिद म्हणाले. पाकिस्तान आणि भारताने एकत्र येत त्यांच्यातील समस्यांचं निराकरण करावं, आम्हाला भारतासह सर्व देशांशी चांगले संबंध हवे आहेत, असंही ते म्हणाले. अफगाणिस्तानमध्ये मजबूत आणि इस्लामवर आधारित सरकार स्थापन करायचे आहे, असे मुजाहिद यांनी सांगितले. सध्या गुआंतानामोचे माजी कैदी मुल्ला अब्दुल कय्यूम झाकीर यांना तालिबानने कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केले आहे. रॉयटर्सने अल जजीरा वृत्तवाहिनीच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. दरम्यान, तालिबानने अद्याप त्यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा केलेली नाही.

दरम्यान ३१ ऑगस्टला अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यापूर्वी एक सरकार अस्तित्वात येईल, असं मुजाहिद यांनी मुलाखतीत सांगितलं. “तालिबान अफगाणिस्तानची भूमी इतर कोणत्याही देशाविरुद्ध वापरू देणार नाही. तालिबानने सर्व भागात नियंत्रण मिळवले आहे. आम्ही सध्या युद्धग्रस्त देशात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत.” असंही ते म्हणाले.