‘आयएसआय’ला स्पष्ट कल्पना

इस्लामाबाद : पाकिस्तानसह कोणत्याही देशाला आपण अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याची मुभा देणार नाही, असे तालिबानने सोमवारी स्पष्ट केले.

दरम्यान, अफगाणिस्तानात सरकार स्थापनेला अंतिम रूप देण्याचे तालिबानचे प्रयत्न सुरू असतानाच; पाकिस्तानच्या शक्तिशाली अशा इंटर- सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) या गुप्तचर संस्थेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हमीद यांनी आपले वास्तविक नेते मुल्ला अब्दुल गनी बारादर यांची भेट घेतली असल्याच्या वृत्तावर तालिबानने शिक्कामोर्तब केले.

आयएसआयचे संचालक असलेले हमीद यांच्या गेल्या आठवडय़ातील काबूलच्या अनाहूत भेटीत अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तालिबान पाकिस्तानसह कोणत्याही देशाला अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याची मुभा देणार नाही, असे संघटनेचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने म्हटल्याचे वृत्त अफगाणिस्तानच्या ‘खामा न्यूज’ने दिले.

काबूल भेटीत हमीद यांनी मुल्ला बारादर याची भेट घेतल्याच्या वृत्ताला झबीउल्ला मुजाहिद याने सोमवारी काबूलमधील पत्रकार परिषदेत दुजोरा दिल्याचे वृत्त बीबीसी उर्दूने दिले. अफगाणिस्तानच्या भूमीचा पाकिस्तानच्या विरोधात वापर केला जाणार नाही असे आश्वासन तालिबानने दिल्याचेही यात म्हटलेआहे.

ले.ज. हमीद यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक प्रतिनिधीमंडळ तालिबानच्या निमंत्रणावरून काबूलला गेल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी यापूर्वी म्हटले होते. मात्र, पाकिस्ताननेच त्यांच्या काबूल भेटीचा प्रस्ताव दिल्याचे तालिबानने स्पष्ट केले.  द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आयएसआयचे प्रमुख अफगाणिस्तानात आल्याचे तालिबानने रविवारी सांगितले होते.