भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांची काही दिवसांपूर्वी बँकॉकमध्ये बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, या चर्चेचा मुख्य रोख हा सीमभागातील दहशतवादावरच होता. द्विपक्षीय चर्चा आणि दहशतवाद एकत्र सुरू राहू शकत नाही, हे भारताचे सध्याचे धोरण आहे. परंतु, ही चर्चा फक्त दहशतवादाच्या मुद्द्यापुरती केंद्रित राहिल्यास त्याला हरकत नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

त्यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. यावेळी त्यांनी ६ डिसेंबर रोजी बँकॉक येथे भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार नसीर खान जंजुआ यांची भेट झाल्याच्या वृत्तालाही दुजोरा दिला. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याबाबत मौन पाळले होते. मात्र, आज परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सविस्तरपणे भूमिका मांडली.

अजित डोवल- पाक सुरक्षा सल्लागारांच्या भेटीवर भारताचे मौन

चर्चा आणि दहशतवाद एकत्रपणे चालू शकत नाहीत, असे आम्ही वारंवार सांगितले आहे. पण अशी काही माध्यमे आहेत ज्यांच्याद्वारे भारत आणि पाकिस्तानमधील चर्चा सुरू असते. बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये चर्चा होत असते. त्याचपद्धतीने दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली होती. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, असे आम्ही सांगत असलो तरी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा निश्चितपणे पुढे जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी डोवाल आणि नसीर खान जंजुआ यांच्यात झालेल्या चर्चेवरही प्रकाश टाकला. कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीने त्यांची पाकिस्तानात भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही देशांचे सुरक्षा सल्लागार एकमेकांना भेटले होते. या चर्चेवेळी भारताकडून सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा प्रश्न उपस्थित केला. तसेच ही चर्चा केवळ दहशतवादाच्या मुद्द्यावरच केंद्रित राहिली. दहशतवादाच्या झळा संपूर्ण देशाला बसू नयेत हे निश्चित करण्याला आमचे प्राधान्य असल्याचे रवीश कुमार यांनी सांगितले.