तिरुचिरापल्ली (तमिळनाडू) पीटीआय

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील प्रचारात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. द्रमुकचे सर्वेसर्वा व तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी भाजपवर हिंसाचाराचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप केला आहे. भाजपने राज्य सरकार हिंदूविरोधी असल्याची टीका केली. उत्तर प्रदेश, मणिपूरप्रमाणे तमिळनाडूत भाजपला दंगे घडवायचे आहेत अशी टीका तिरुचरापल्ली येथील प्रचारसभेत स्टॅलिन यांनी केली.

सरकारने केलेल्या विकासकामांचा उल्लेख त्यांनी प्रचारात केला. तिरुचलापल्लीचा चेन्नईप्रमाणे विकास केला जाईल असे आश्वासन स्टॅलिन यांनी दिले. गेल्या पाच वर्षांत येथील विकासकामांसाठी २६ हजार कोटी रुपये दिल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपशासित राज्यांप्रमाणे तमिळनाडूत धार्मिक हिंसाचार झाला नसल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला. तसेच भाजप-अण्णा द्रमुक युतीचा पराभव होईल असे भाकित त्यांनी वर्तवले.

भाजपकडून राज्य सरकारविरोधात आरोपपत्र

राज्यातील द्रमुक सरकार आश्वासने पाळण्यात अपयशी ठरल्याची टीका भाजपने केली आहे. पक्षाचे राज्य निवडणूक प्रभारी पीयूष गोयल यांनी हे आरोपपत्र प्रकाशित केले. त्यात राज्य सरकारवर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवस्थापन तसेच हिंदू विरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सर्वच विभागांत भ्रष्टाचार बोकाळल्याचा दावाही पक्षाने केला आहे.

‘लोकपोल’च्या सर्वेक्षणात द्रमुकला संधी

लोकपोल या सर्वेक्षण संस्थेने तमिळनाडूत १८१ ते १८९ जागांसह पुन्हा द्रमुक सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला आहे. द्रमुक आघाडीला ४०.१ टक्के मते मिळतील असे भाकितही यामध्ये आहे. तर मुख्यविरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकला २९ टक्के मतांसह केवळ ३८ ते ४२ जागा मिळतील असे या सर्वक्षणात स्पष्ट केले. अभिनेते विजय यांचा पक्ष आठ ते दहा जागांसह २३.९ टक्के मते मिळवून तिसऱ्या स्थानावर राहील असे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले.