मतदारांना खूश करण्यासाठी दिलेली मोफतची आश्वासने मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या पथ्यावर पडली. सरकारच्या विरोधात नाराजी असूनही त्याचा फटका बसणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. यातूनच गेल्या तीन दशकांची प्रथा मोडून पुन्हा सत्तेत येण्याचा जयललिता यांचा मार्ग मोकळा झाला. द्रमुकने यंदा मोफतचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते. मोफतचे मतदारांना आकर्षण असते हे तामिळनाडूच्या निकालावरून स्पष्ट झाले. अम्मा नीर, अम्मा इडली, अम्मा आरोग्य सेवा अशा विविध लोकानुनय करणाऱ्या योजना राबवून जयललिता यांनी गरीब वर्गाला खूश केले होते. शिधापत्रिकाधारकांना मोफत मोबाइल, १०० युनिटपर्यंत मोफत वीज यांसारखी आश्वासने लोकांना चांगलीच भावली. सत्तेत आल्यावर टप्प्याटप्प्याने दारूबंदी करण्याच्या घोषणेने महिला वर्गात अम्मांना पाठिंबा मिळाला. महिला वर्ग मोठय़ा प्रमाणावर मतदानाला बाहेर पडला, याचाही जयललितांना फायदा झाला.
जयललिता यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द भ्रष्टचार किंवा गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे गाजली होती. या पाच वर्षांत कोणताही आरोप चिकटणार नाही, याची खबरदारी त्यांनी घेतली. यापूर्वी सत्तेत अतताना बेहिशेबी मालमत्तेच्या संदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्य़ात जयललिता यांना तुरुंगात जावे लागले. परिणामी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. विरोधकांनी हा प्रचारात मुद्दा केला होता, पण द्रमुकच्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने हा मुद्दा जयललिता यांना तेवढा त्रासदायक ठरला नाही. तसेच विजयाकांत यांच्या एमडीएमके पक्षाने वेगळी चूल मांडल्याचा जयललिता यांना फायदा झाला. विजयाकांत यांच्या आघाडीला एकूण मतांच्या अडीच टक्के मते मिळाली आहेत. भाजपने जोर लावला होता, पण खाते उघडता आले नाही. अंबुमणी रामोदास यांच्या आघाडीला पाच टक्के मते मिळाली, पण त्यांनाही खाते उघडता आले नाही. विजयाकांत, अंबुमणी रामोदास यांच्या आघाडय़ांमुळे अम्मांना फायदाच झाला. भाजपने अम्मांना मदत होईल, अशीच व्यूहरचना केली होती. गेल्या डिसेंबर महिन्यात आलेल्या पुरानंतर चेन्नई व आसपासच्या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. मदतीवरून नागरिकांमध्ये नाराजी होती. पण नुकसानग्रस्तांच्या मदतीकरिता एकाच दिवशी ५०० कोटींची मदत बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली. तसेच पुनर्वसनाच्या कामात विशेष लक्ष घातले. याचा शहरात अम्मांना फारसा फायदा झाला नाही. १९८० आणि १९८४ असा लागोपाठ दोनदा जयललिता यांचे गुरू एम. जी. रामचंद्रन यांनी विजय प्राप्त केला होता. त्यानंतर आलटूनपालटून सत्तेत येण्याची तामिळनाडूमध्ये प्रथाच पडली होती. ही परंपरा जयललिता यांनी खंडित केली. यंदाच्या निवडणुकीत कोणतीही लाट नव्हती. ९२ वर्षीय एम. करुणानिधी यांना मतदारांनी नाकारले आहे. ग्रामीण भागात अम्मांना पाठिंबा मिळाला. करुणानिधी पुत्र स्टॅलिन यांनी बरीच मेहनत घेतली होती, सत्तेसाठी द्रमुकने काँग्रेसबरोबर आघाडी केली, पण त्याचाही फारसा फायदा झाला नाही. आघाडीकरिता अम्मांच्या विरोधकांशी हातमिळवणी करून करुणानिधींनी निवडणूक सोपी नाही, असा संदेश दिला होता. अम्मा साऱ्यांना पुरून उरल्या.