तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. लोकभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी २३ नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ घेणार्या मंत्र्यांमध्ये काँग्रेसच्या दोन सदस्यांचाही समावेश आहे. यामुळे तमिळनाडूमध्ये काँग्रेस तब्बल ५९ वर्षांनी सत्तेत सहभागी झाली आहे.
तमिळगा वेत्री कळघमचे आमदार श्रीनाथ, एस. कमली, सी. विजयालक्ष्मी आणि आर. व्ही. राजकुमार यांनी सुरुवातीला मंत्रिपदाची शपथ घेतली. श्रीनाथ हे मुख्यमंत्री विजय यांचे मित्र आहेत, त्यांनी सर्वात प्रथम शपथ घेतली. अल्पसंख्याक समुदायाचे मोहम्मद फारवस जे. आणि एन. मारी विल्सन यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेसचे कार्यकर्ते गेल्या ५९ वर्षांपासून सत्ता मिळवण्यासाठी निष्ठा आणि समर्पणाने काम करत होते. आता त्यांना ती मिळाली आहे, असे तमिळनाडूचे काँग्रेस प्रभारी गिरीश चोडणकर म्हणाले.
काँग्रेसमध्ये उत्साह
तमिळनाडू हे मद्रास राज्य असताना १९६३ ते १९६७ या काळात एम. भक्तवत्सलम हे तेथील काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसचे किल्लीयूरचे आमदार एस. राजेश कुमार आणि मेलुरचे आमदार पी. विश्वनाथन यांनीही गुरुवारी शपथ घेतली. काँग्रेसच्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणे हा तमिळनाडूच्या राजकीय इतिहासातील परिवर्तनाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रभारी गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केली. करूरच्या काँग्रेस खासदार जोतिमणी यांनीही काँग्रेस मंत्रिमंडळात सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
