Tamil Nadu Cabinet Portfolio Allocation : तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पदभार स्वीकारताच निर्णयांचा धडाका लावत आपल्या कामाचा झंझावात सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी तमिळनाडू विधानसभेत झालेल्या विश्वासदर्शक ठरावात तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाच्या सरकारला १४४ आमदारांचं पाठबळ मिळालं. त्यामुळे तमिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच मुख्यमंत्री विजय यांनी त्यांच्या सरकारचं खातेवाटप जाहीर केलं आहे.

मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी स्वत:कडे नेमकं कोण-कोणत्या खात्यांची जबाबदारी घेतली? कोणत्या नेत्यांवर कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली? तमिळनाडूचं गृहखातं कोणाकडे सोपवलं? अर्थमंत्रालयाची जबाबदारी कोणाकडे सोपवली? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोणाला कोणतं मंत्रिपद दिलं? वाचा यादी!

मुख्यमंत्री जोसेफ विजय : सार्वजनिक, सामान्य प्रशासन, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय वन सेवा, जिल्हा महसूल, गृह, विशेष कार्यक्रम अंमलबजावणी, महिला व बाल कल्याण, ज्येष्ठ आणि अपंग कल्याण, नगरपालिका प्रशासन, शहरी प्रशासन आणि पाणीपुरवठा या खात्यांचा कार्यभार मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्याकडे असेल.

एन.आनंद : ग्रामीण विकास आणि जलसंपदा मंत्री

आधव अर्जुन : सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विकास मंत्री

डॉ.के.जी.अरुणराज : आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण मंत्री

के.ए.सेंगोत्तैयन : अर्थमंत्री

आर.निर्मलकुमार : ऊर्जा संसाधने आणि कायदा मंत्री

एस.कीर्तना : उद्योग मंत्री

डॉ.टी.के.प्रभू : नैसर्गिक संसाधने व खनिजे

राजमोहन : शालेय शिक्षण, तमिळ विकास, माहिती व जनसंपर्क

दरम्यान, आधव अर्जुन हे सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विकास मंत्री झाले आहेत. ते सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विकास या खात्याची जबाबदारी सांभाळतील. तसेच डॉ.के.जी.अरुणराज हे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण खात्याची जबाबदारी सांभाळतील. तसेच पी.व्यंकटरमन हे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी सांभाळतील. तसेच एन.आनंद हे ग्रामीण विकास आणि जलसंपदा मंत्री झाले आहेत. या बरोबरच एस.कीर्तना यांच्याकडे उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच राजमोहन हे शालेय शिक्षण, तमिळ विकास, माहिती व जनसंपर्क खात्याची जबाबदारी सांभाळतील. तसेच ते पुरातत्व, तमिळ भाषा आणि तमिळ संस्कृती, चित्रपट तंत्रज्ञान आणि सिनेमॅटोग्राफ कायदा, वृत्तपत्र छपाई, लेखनसामग्री आणि मुद्रण व शासकीय मुद्रणालय या विभागांचंही पर्यवेक्षण करतील.

एस.कीर्तना यांच्यावर थेट उद्योग खात्याची जबाबदारी

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री पदावर टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय विराजमान झाल्यानंतर चेन्नई येथे पार पडलेल्या सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच इतर नऊ नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली होती. या सर्वांमध्ये शिवकाशी मतदारसंघातून निवडून आलेल्या २९ वर्षीय टीव्हीके आमदार एस.कीर्तना या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. या मतदारसंघातून विजयी होणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत.

निवडणुकीत जिंकल्यानंतर एस.कीर्तना यांनी हिंदीतून संवाद साधला होता. ज्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष्य वेधलं गेलं होतं. आपल्या नेत्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना तो समजावा, यासाठी आपण हिंदी भाषेची निवड केल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी लादली जाण्यावरून राजकीय वाद पेटलेला असताना त्यांची ही कृती विशेष ठरली होती.

दरम्यान, याच एस.कीर्तना यांच्यावर आता मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी थेट उद्योग खात्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे एस.कीर्तना यांच्यावर आता तमिळनाडूत गुंतवणूक आणण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

एस.कीर्तना कोण आहेत?

शिवकाशी मतदारसंघातून निवडून आलेल्या एस.कीर्तना या तमिळगा वेत्री कळघमच्या नवनिर्वाचित आमदार आहेत. त्यांनी पूर्वी एक पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम केलेलं असून त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. त्यांनी यापूर्वी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के.स्टालिन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसोबत काम केलेलं आहे.

Tamil Nadu Cabinet Portfolio Allocation

टीव्हीके प्रमुख सी.जोसेफ विजय यांच्या समर्थक असलेल्या एस. कीर्तना यांना एकापेक्षा जास्त भाषा अवगत आहेत. तमिळ माध्यमातील सरकारी शाळेत शिकलेल्या कीर्तना यांनी पुढे इतर भाषांवर प्रभुत्व मिळवलं. शिवकाशी मतदारसंघात गेल्या सात दशकांपासून असलेल्या पुरुषांचे वर्चस्व संपवत त्या तिथल्या पहिल्या महिला आमदार झाल्या आहेत.

निवडणूक प्रचारावेळी एस.कीर्तना यांनी विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीमधील विकास हा केंद्रस्थानी ठेवला होता. त्यांनी सुरक्षितता आणि आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधांच्या समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. तसेच त्यांनी फटाक्याची राजधानी असलेल्या मतदारसंघात फक्त एकच अग्निशामक केंद्र असल्याचा मुद्दा अधोरेखित केला, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावेळी त्यांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटीही अधोरेखित केल्या, त्यांनी सरकारी रुग्णालयात विशेष वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले. कीर्तना यांनी निवडणूक प्रचारादरम्यान फटाका उद्योगात काम करणाऱ्या कामगारांसाठी सर्वसमावेशक कल्याणकारी उपाययोजना लागू करण्याचे आश्वासन दिले. ज्यामध्ये विमा संरक्षण, महिलांना समान वेतन, नियमित आरोग्य तपासणी आणि घातक रसायनांच्या संपर्कात येणाऱ्या कामगारांसाठी चांगल्या उपचारांच्या सुविधा अशी आश्वासने दिली होती. तसेच निवडणुकीतील विजयानंतर पत्रकारांशी बोलताना कीर्तना यांनी प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचं सांगितलं होतं.