तमिळनाडू्च्या मुख्यमंत्रि‍पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जोसेफ विजय यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाची देशभरात चर्चा होत आहे. असं असतानाच मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या एका व्हिडीओची सध्या मोठी चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्री जोसेफ विजय हे चक्क बस कंडक्टर बनल्याचे पाहायला मिळाले आहेत. मुख्यमंत्री विजय यांनी शुक्रवारी ‘वेत्री पयनम थिट्टम’ या योजनेच्या विस्ताराचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत तमिळनाडू्तील महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेच्या विस्ताराच्या शुभारंभावेळी मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी बस कंडक्टरची भूमिका साकारत प्रवाशांना स्वत: बसचं तिकीट दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून मुख्यमंत्री विजय यांनी चेन्नईमध्ये बसने प्रवास केला. यावेळी विजय यांनी प्रवाशांशी संवाद साधला आणि स्वतः महिलांना मोफत तिकिटे दिली. या प्रवासादरम्यान एक हलका-फुलका क्षण पाहायला मिळाला. यावेळी बसमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना चॉकलेट्स दिली.

दरम्यान, तमिळनाडू सरकारच्या या विस्तारित योजनेचा लाभ सुमारे ८४.३२ लाख महिलांना मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेचे लाभार्थी राज्य परिवहन महामंडळांच्या १२,६९५ बसेसमधून मोफत प्रवास करू शकतात. यामध्ये एक्सप्रेस श्रेणीतील बसेसचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही आणि लाभार्थी एका दिवसात कितीही वेळा प्रवास करू शकतात, असं तमिळनाडू सरकारने स्पष्ट केलं आहे.

परिवहन मंत्री ए.विजय तमिळन पार्थिबन यांनी सांगितलं की, “या योजनेचा उद्देश महिला आणि तृतीयपंथी व्यक्तींच्या प्रगतीमध्ये वाहतुकीचा खर्च अडथळा ठरू नये हे सुनिश्चित करून त्यांच्या शिक्षण, रोजगार, उपजीविका आणि आर्थिक सक्षमीकरणाला पाठिंबा देणं हा आहे. वाहतुकीच्या खर्चामुळे शिक्षण, रोजगार किंवा आरोग्यसेवा मिळवण्यात त्यांना कोणताही अडथळा येऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे.”