तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठरावात १४४ आमदारांचं पाठबळ मिळवत तमिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर काही दिवसांतच मुख्यमंत्री विजय यांनी त्यांच्या सरकारचं खातेवाटप जाहीर करत कामाचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या कामाची देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, असं असतानाच मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिलेल्या ‘सीपीआय-एम’कडून मोठा इशारा देण्यात आला आहे.
‘जर एआयएडीएमकेला मंत्रिमंडळात स्थान दिलं, तर मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेल्या समर्थनाचा आम्ही पुनर्विचार करू’, असा इशारा ‘सीपीआय-एम’ पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे तमिळनाडूतील टीव्हीके सरकार अडचणीत आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
‘सीपीआय-एम’कडून काय इशारा देण्यात आला?
मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात एआयएडीएमकेला स्थान देऊ नये, म्हणून सीपीआय(एम) कडून इशारा देण्यात आला आहे. सीपीआय (एम) चे राज्य सचिव पी.षण्मुगम यांनी म्हटलं की, “जर एआयएडीएमकेला मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं तर आम्ही जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेल्या समर्थनाचा पुनर्विचार करू. पण आमचा ठाम विश्वास आहे की मुख्यमंत्री जोसेफ विजय असा निर्णय घेणार नाहीत. मात्र, जर त्यांनी एआयएडीएमकेला मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही आमच्या पाठिंब्याचा पुनर्विचार करू”, असं पी.षण्मुगम यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
एआयएडीएमकेच्या एका गटाचा विजय यांना पाठिंबा
तमिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षात फूट पडली आहे. माजी मुख्यमंत्री जे.जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षाबाबत जी भीती व्यक्त केली जात होती, ती प्रत्यक्षात घडली आहे. अण्णाद्रमुक मधील वरिष्ठ नेते एस.पी.वेलुमणी आणि सी.वे.षण्मुगम यांच्या नेतृत्वाखालील २५ आमदारांनी विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. तसेच एडप्पाडी के.पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील २२ आमदारांनी विरोधात राहण्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान, एआयएडीएमकेच्या एका गटाने विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिल्यामुळे त्या गटातील काही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र, आता एआयएडीएमकेच्या एका गटाला मंत्रिमंडळात स्थान दिल्यास सीपीआय (एम) कडून थेट मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा पुनर्विचार करण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे आता मुख्यमंत्री विजय यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अण्णाद्रमुकमधील असंतोषाचं मुख्य कारण काय?
अण्णाद्रमुक मधील नेत्यांनी वारंवार होणाऱ्या पराभवाने एडापद्दी के.पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच ते पक्षाला सत्तेतजवळ घेऊन जाण्यापासून रोखत आहेत, नव्या शक्तींचा विरोध करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर होत होता. अण्णाद्रमुक पक्षातील खदखदीचे, असंतोषाचे मुख्य कारण म्हणजे अण्णाद्रमुकने विजय यांना समर्थन द्यायला हवे होते, सत्तेत सहभागी व्हायला हवे होते, असे मानणाऱ्या आमदारांची संख्या मोठी होती.
बातमी अपडेट होत आहे.
