Joseph Vijay CM Oath Ceremony live updates: TVK leader Vijay begins a new political era in Tamil Nadu after winning 108 seats : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या टीव्हीकेचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे आपले बहुमत सिद्ध करताना अडथळ्यांचा सामना केल्यानंतर अखेर विजय यांचा शपथविधी आज (रविवार) पार पडला. हा कार्यक्रम चेन्नईच्या जवाहरलाल स्टेडियमवर पार पडला.
दरम्यान राज्यपाल आर्लेकर यांनी जोसेफ विजय यांना १३ मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे.
विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळला. याबरोबरच टीव्हीकेने द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा मुन्नेत्र कळघम या पक्षांचे ५० वर्षांचे वर्चस्व मोडीत काढले आहे. ५१ वर्षीय विजय यांनी या दोन्ही पक्षांना निवडणुकीत मोठ्या फरकारने मागे टाकले . विजय आता एम.के. स्टॅलिन यांच्यानंतर तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत.
व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने शनिवारी टीव्हीकेला दिलेल्या पाठिंब्यामुळे विजय यांना आवश्यक असलेले बहुमत गाठता आले. काँग्रेस, सीपीआय आणि सीपीआय (एम) यांनी आधीच टीव्हीकेला पाठिंबा दिला होता, ज्यामुळे शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांचे संख्याबळ १०७ वरून ११६ वर पोहोचले. त्यानंतर व्हीसीके आणि आययूएमएल हे पक्षदेखील सोबत आल्याने हा आकडा १२० वर गेला.
विजय यांच्याबरोबर मंत्रिमंडळातील नऊ सदस्यांनीही शपथ घेतली. एम. जी. रामचंद्रन यांच्या काळापासून तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात परिचित चेहरा असलेले के. ए. सेंगोट्टायन यांचा अपवाद वगळता, इतर सर्वजण पहिल्यांदाच मंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
विजय यांच्या मंत्रिमंडळातील नऊ सदस्यांची यादी –
१. एन. आनंद
२. आधव अर्जुना
३. डॉ. के. जी. अरुणराज, एम. बी. बी. एस.
४. के. ए. सेंगोट्टायन
५. पी. व्यंकटरमणन, एम. कॉम., एम. बी. ए., एम. एल.
६. आर. निर्मलकुमार
७. राजमोहन
८. डॉ. टी. के. प्रभू, बी. डी. एस., एम. एस्सी. डी., एम. एस्सी., आय. सी. डी. आय., एफ. आय. सी. ओ. आय.
९. एस. कीर्तना, एम. एस्सी.
