तमिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. सहकारी बँकांकडून १ मे २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेतलेले ७५,००० रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री विजय यांनी मंगळवारी केली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
१४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा
तमिळनाडू सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या कर्जमाफी योजनेचा थेट फायदा राज्यातील सुमारे १४.४३ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या मेगा कर्जमाफीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ५,९३२ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. तरीही शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी चेन्नई येथील सचिवालयात मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांचे सहकारी बँकेतील पीक कर्ज ७५,००० रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना देखील सरकारने दिलासा दिला असून अशा शेतकऱ्यांचे ३५,००० रुपये माफ केले जातील, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
आधीच्या निर्णयात सुधारणा
विशेष म्हणजे, तमिळनाडू सरकारने गेल्या महिन्यातच अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ५०,००० रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र, या मर्यादेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री विजय यांनी जुन्या निर्णयात सुधारणा करत कर्जमाफीची मर्यादा थेट ७५,००० रुपयांपर्यंत वाढवली आहे.
६० दिवसांत पैसे जमा होणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि मॉडेल ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार, सरकारी कर्जमाफी योजनेची संपूर्ण रक्कम ४५ ते ६० दिवसांच्या आत बँकांमध्ये जमा करणे आवश्यक आहे. तमिळनाडू सरकार या नियमांचे पालन करून अत्यंत वेगाने ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
“राज्याची सध्याची आर्थिक स्थिती आव्हानात्मक आहे. अशा कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या कल्याणाला प्राधान्य देत मुख्यमंत्र्यांनी जवळपास ६,००० कोटी रुपयांची कर्जमाफी मंजूर केली आहे. आगामी मशागत आणि पेरणीच्या हंगामासाठी नवीन कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी अत्यंत फायदेशीर ठरेल,” असा विश्वास मुख्यमंत्री कार्यालयाने व्यक्त केला आहे. विजय यांच्या या निर्णयामुळे तामिळनाडूतील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
