तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आपल्या वैयक्तिक ज्योतिषाची मुख्यमंत्री कार्यालयात ‘विशेष कार्य अधिकारी’ (OSD) म्हणून नियुक्ती केल्याने नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्र्यांचे ज्योतिषी राधन पंडित वेट्रिवेल यांची या महत्त्वाच्या पदावर वर्णी लावल्याने मित्रपक्ष असलेल्या व्हीसीकेसह, डीएमडीके आणि एमजेके या पक्षांनी जोरदार टीका केली आहे.

नेमका वाद काय?

तमिळनाडू विधानसभेत सध्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया सुरू आहे. याच काळात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयावर विरोधी आणि मित्रपक्षांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे, ज्या ज्योतिषाने विजय यांच्या पक्षाच्या विजयाची भविष्यवाणी केली होती, त्यांनाच आता थेट सरकारी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. यामुळे प्रशासनात ज्योतिषशास्त्राचा वाढता हस्तक्षेप चर्चेचा विषय ठरला आहे.

‘विज्ञानावर लक्ष केंद्रित करा’; मित्रपक्षांचा घरचा आहेर

मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देणाऱ्या VCK (विदुथलाई चिरुथाईगल काची) या पक्षाने या नियुक्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सरकारने ज्योतिषापेक्षा विज्ञानावर अधिक विश्वास ठेवला पाहिजे. प्रशासनात वैज्ञानिक विचारसरणीला प्राधान्य देणे आवश्यक आहे,” असे मत VCK च्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले. अशा नियुक्त्यांमुळे जनतेमध्ये आणि तरुण पिढीमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची भीती राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. टीका करूनही, विश्वासदर्शक ठरावावेळी VCK ने विजय सरकारला पाठिंबा कायम ठेवला आहे, ही विशेष बाब ठरली आहे.

‘डीएमडीके’ची भूमिका

विजयकांत यांच्या ‘डीएमडीके’ पक्षानेही या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित ज्योतिषाची नेमकी पात्रता काय आणि एका ज्योतिषाला सरकारी पदावर बसवून सरकार काय साध्य करू इच्छिते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

मद्रास उच्च न्यायालयात धाव

हा मुद्दा केवळ राजकीय राहिला नसून आता न्यायालयीन कक्षेत पोहोचला आहे. या नियुक्तीविरोधात मद्रास उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली होती. “ही नियुक्ती कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही,” असा युक्तिवाद वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने या प्रकरणाची तातडीने दखल घेण्यापूर्वी अधिकृत याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे वृत्त न्यूज१८ ने प्रसिध्द केले आहे.

तमिळनाडूच्या परंपरेला धक्का?

तमिळनाडूचे राजकारण हे प्रामुख्याने तर्कवाद आणि पेरियार यांच्या विचारांवर आधारलेले मानले जाते. अशा राज्यात एका ज्योतिषामुळे सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे, हे राज्याच्या राजकीय संस्कृतीसाठी आव्हानात्मक असल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी मुख्यमंत्री विजय किंवा त्यांच्या पक्षाकडून या टीकेवर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, ‘फ्लोर टेस्ट’च्या धामधुमीत विज्ञानाचा की ज्योतिषाचा विजय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.