तमिळनाडूच्या राजकारणात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके (TVK) सरकारने सत्तेत येताच पहिला मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. तीव्र विरोध आणि मित्रपक्षांच्या दबावानंतर, मुख्यमंत्री विजय यांनी आपले निकटवर्तीय आणि ज्योतिषी राधन पंडित वेट्रिवेल यांची ‘विशेष कार्य अधिकारी’ (OSD) पदावरील नियुक्ती अवघ्या काही तासांत रद्द केली आहे.

नेमके प्रकरण काय?

विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर, मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी मंगळवारी राधन पंडित यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात केली होती. राधन पंडित हे केवळ विजय यांचे ज्योतिषीच नाहीत, तर त्यांनी निवडणुकीत विजय यांच्या विजयाची भविष्यवाणीही केली होती. प्रचारादरम्यान त्यांनी पक्षाचे प्रवक्ते आणि मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ४ मे रोजी मतमोजणी सुरू असताना, जेव्हा टीव्हीके आघाडीवर होती, तेव्हा विजय यांची भेट घेणारी राधन पंडित ही पहिली व्यक्ती होती.

मित्रपक्ष आणि विरोधकांचा तीव्र संताप

राधन पंडित यांच्या नियुक्तीची बातमी समोर येताच राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठली. विशेषतः विजय यांच्यासोबत सत्तेत असलेल्या मित्रपक्षांनीच यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल यांनी सोशल मीडियावर सवाल केला की, “एका ज्योतिषाला ओएसडी पदाची गरजच काय? हे अनाकलनीय आहे.”

tamil-nadu-cm-vijay-government-u-turn-radhan-pandit-osd-appointment-cancelled
ज्योतिषी राधन पंडित वेट्रिवेल यांची ‘विशेष कार्य अधिकारी’ (OSD) पदावरील नियुक्ती अवघ्या काही तासांत रद्द केल्याचे पत्रक

VCK (विदुथलाई चिरुथाईगल कात्ची) पक्षाचे सरचिटणीस डी. रविकुमार यांनी ही नियुक्ती ‘असंवैधानिक’ असल्याचे म्हटले. “धर्मनिरपेक्ष सरकारमध्ये अशा नियुक्त्या स्वीकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याऐजी सरकार ज्योतिषशास्त्राला प्रोत्साहन देत आहे,” अशी टीका त्यांनी केली. तर सरकारी खर्चाने अशा व्यक्तीची नियुक्ती करणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे आहे, असे मत सीपीएम नेते षण्मुगम यांनी व्यक्त केले.

विधानसभेतही पडसाद

१३ मे रोजी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी (Floor Test) देखील हा मुद्दा गाजला. व्हीसीके आमदार वन्नी अरासु यांनी टोला लगावला की, “सरकारने ज्योतिषावर नाही, तर विज्ञानावर लक्ष केंद्रित करावे.” तर डीएमडीके सरचिटणीस प्रेमलता विजयकांत यांनी ही नियुक्ती तामिळनाडूच्या जनतेचा अपमान असल्याचे सांगत निषेध नोंदवला.

शेवटी मुख्यमंत्र्यांची माघार

विधानसभेतील गदारोळ आणि मित्रपक्षांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून मुख्यमंत्री विजय यांनी नमती भूमिका घेतली. सभागृहात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रेमलता विजयकांत आणि इतर नेत्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा ते गांभीर्याने विचार करतील. या भाषणानंतर अवघ्या एका तासात सरकारने अधिकृत आदेश काढून राधन पंडित यांची नियुक्ती रद्द केली.

तमिळनाडूच्या राजकारणात विवेकवाद (Rationalism) आणि वैज्ञानिक विचारांचा मोठा वारसा आहे. अशा परिस्थितीत एका ज्योतिषाला सरकारी पदावर बसवण्याचा निर्णय विजय सरकारला महागात पडला असता, हे ओळखूनच हा तातडीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.