पीटीआय, चेन्नई

‘‘माझ्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मीच एकमेव सत्ताकेंद्र असेल,’’ अशी स्पष्टोक्ती तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सी. जोसेफ विजय यांनी रविवारी व्यक्त केली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात राज्यामध्ये वेगवेगळी सत्ताकेंद्रे असतील, या विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी बहुमताचा आकडा गाठल्याने रविवारी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. चेन्नईतील नेहरू क्रीडा संकुलात रविवारी सकाळी १० वाजता राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री म्हणून केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात विजय यांनी स्वत:ची ओळख एका सामान्य कुटुंबातील सामान्य नागरिक अशी करून दिली. ‘‘गरिबी आणि उपासमारीबद्दल मी अधिक जागरूक आहे. कारण माझा जन्म एका सामान्य साहाय्यक चित्रपट दिग्दर्शकाच्या घरात झाला, ज्याने कठोर परिश्रमाने चित्रपटसृष्टीत यश मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते,’’ असे विजय म्हणाले.

‘‘एक नवी सुरुवात, एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. खर्‍या धर्मनिरपेक्ष, सामाजिक न्यायाचे एक नवे पर्व आता सुरू झाले आहे,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझ्या राजवटीत केवळ एकच सत्ताकेंद्र असेल आणि ते म्हणजे माझ्या नेतृत्वाखालील केंद्र. या बाजूला एक केंद्र, त्या बाजूला एक सत्ताकेंद्र, आणखी वेगळे सत्ताकेंद्र- यापैकी काहीही अस्तित्वात नाही, अशी स्पष्टोक्ती विजय यांनी केली.

‘‘मी खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करणार नाही. मात्र तमिळनाडू सरकारच्या सद्य:स्थितीबद्दल सांगायचे आहे. राज्यावर १० लाख कोटींपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर आहे आणि सरकारी तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली आहे. मात्र कोट्यवधी जनतेच्या पाठिंब्याने अत्यंत कठीण कामेही साध्य करणार आहोत,’’ असा विश्वास विजय यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री विजय यांच्यासह नऊ मंत्र्यांचाही शपथविधी झाला. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांतील नेते उपस्थित होते.

तिरुचिरापल्ली मतदारसंघाचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीत दोन जागा जिंकणार्‍या मुख्यमंत्री विजय यांनी एक जागा सोडली. पेरांबूर मतदारसंघाची आमदारकी कायम ठेवत त्यांनी तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला.

कर्ज मर्यादेतच, स्टॅलिन यांचे प्रत्युत्तर

राज्याच्या कर्जबाजारीपणावर भाष्य करणार्‍या मुख्यमंत्री विजय यांना माजी मुख्यमंत्री व द्रमुकचे अध्यक्षी एम. के. स्टॅलिन यांनी प्रत्युत्तर दिले. तमिळनाडूचे कर्ज अनुज्ञेय मर्यादेतच आहे. मात्र जनतेची कामे करण्याची मानसिकता हवी, असे स्टॅलिन म्हणाले. विजय यांनी नुकतीच प्रशासकीय जबाबदारी स्वीकारल्यामुळे, त्यांना प्रशासनातील आव्हाने आणि निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्यामधील अडचणी हळूहळू समजतील. सरकारकडै पैसे नाहीत, असे लगेच म्हणायला सुरुवात करू नका. ज्या नागरिकांनी तुम्हाला मतदान केले, त्यांची फसवणूक करू नका, असे स्टॅलिन म्हणाले. विजय यांचे अभिनंदन करत स्टॅलिन यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या.

मोफत वीज, महिला सुरक्षेवर भर

तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी रविवारी आपल्या निवडणूक आश्वासनांचा भाग म्हणून वीज, महिला सुरक्षा आणि अमली पदार्थ निर्मूलनाशी संबंधित तीन योजना सादर केल्या. पदभार स्वीकारल्यानंतर, विजय यांनी एका शासकीय आदेशावर स्वाक्षरी केली. या आदेशानुसार दोन महिन्यांत ५०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणार्‍या घरगुती ग्राहकांना २० युनिट वीज मोफत दिली जाणार आहे. महिला सुरक्षा वाढवण्यासाठी राज्यभरात पुरेसे मनुष्यबळ आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे ‘सिंगा पेन विशेष कृती दल’ स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ‘सिंगा पेन’ याचा शब्दश: अर्थ ‘सिंहिणी’ असा होतो, परंतु सामान्यत: हा शब्द एका धाडसी स्त्रीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. तामिळनाडूमध्ये अमली पदार्थांशी संबंधित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी एकूण ६५ ‘अमली पदार्थ विरोधी कृती दल’ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली.

नवी पिढी, नवा आवाज- राहुल गांधी

तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी शपथ घेतल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले. राज्याने एका नव्या पिढीची, नव्या आवाजाची आणि नव्या विचारांची निवड केली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. विजय हे नक्कीच तमिळनाडूच्या जनतेच्या आशा पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.