तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आपल्या कृतीतून एक नवा आदर्श घालून दिला आहे. एका पर्यावरणवादी कार्यकर्तीच्या आवाहनाला मान देत, मुख्यमंत्री विजय यांनी सरकारी कार्यालयांमधील ब्रिटिशकालीन ‘व्हीआयपी संस्कृती’ला (VIP Culture) मूठमाती दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर वर्षानुवर्षे ठेवला जाणारा पारंपारिक पांढरा टॉवेल विजय यांनी हटवला असून, त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर जोरदार स्वागत होत आहे.
पर्यावरणवादी कार्यकर्तीच्या आवाहनानंतर २४ तासांत निर्णय
प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ती लिसिप्रीया कांगुजम (Licypriya Kangujam) हिने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना एक आवाहन केले होते. सरकारी कार्यालयांमध्ये मंत्र्यांपासून ते अगदी कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच खुर्च्यांवर पांढरा टॉवेल ठेवण्याची एक जुनी प्रथा आहे. ही ‘टॉवेल संस्कृती’ व्हीआयपी मानसिकतेचे प्रतीक असून ती बंद करण्यात यावी, अशी मागणी लिसिप्रीयाने केली होती. विजय यांनी स्वतःपासून सुरुवात करून हा बदल घडवून आणावा, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. या आवाहनानंतर अवघ्या २४ तासांच्या आत मुख्यमंत्री विजय यांनी कोणतीही अधिकृत घोषणा किंवा प्रसिद्धी न मिळवता शांतपणे आपल्या खुर्चीवरून तो पांढरा टॉवेल हटवला.
फोटोंमधून समोर आला बदल
या बदलाबद्दल मुख्यमंत्री कार्यालय किंवा तामिळनाडू सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या शासकीय बैठकांच्या फोटोंमधून हा मोठा बदल समोर आला आहे.
१४ मे रोजीची बैठक:सचिवालय येथे झालेल्या उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री विजय हे नेहमीप्रमाणे पांढरा टॉवेल असलेल्या पारंपारिक व्हीआयपी खुर्चीवर बसलेले दिसले होते.
१५ मे रोजीची बैठक: मात्र, शुक्रवारी ‘TAFE’ कंपनीच्या अध्यक्षा मल्लिका श्रीनिवासन आणि उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मी वेणू यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे फोटो समोर आले, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरचा तो पांढरा टॉवेल गायब होता.
“सामान्य जनतेचा आवाज ऐकणारा मुख्यमंत्री”, अशा शब्दांत लिसिप्रीया कांगुजम हिने विजय यांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनीही हा नोकरशाही आणि राजकारणातील ‘व्हीआयपी’ थाट मोडीत काढणारा एक ऐतिहासिक आणि प्रतीकात्मक बदल असल्याचे म्हटले आहे.
काय आहे या ‘पांढऱ्या टॉवेल’चा इतिहास?
भारतातील सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या खुर्चीवर पांढरा टॉवेल टाकण्याची प्रथा ही ब्रिटिशकालीन (Colonial Era) गुलामगिरीची आणि वर्गभेदाची आठवण करून देणारी आहे.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश अधिकारी आपल्या केसांची रचना नेटकी ठेवण्यासाठी ‘मॅकॅसर ऑइल’ (Macassar oil) नावाचे एक तेल वापरायचे. खुर्चीच्या महागड्या लेदरला किंवा लाकडाला हे तेल लागून डाग पडू नयेत, म्हणून खुर्चीच्या वरच्या भागावर कापड ठेवले जायचे. पुढे भारताच्या उष्ण हवामानामुळे या कापडाची जागा पूर्ण पांढऱ्या टॉवेलने घेतली, जेणेकरून घाम शोषला जावा.
विजयकडून निर्णयांचा धडाका
अभिनेते ते नेते बनलेल्या विजय यांनी १० मे रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाने विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून यश मिळवले असून, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने त्यांनी सरकार स्थापन केले आहे. सत्ता हातात येताच घेतलेल्या निर्णयांमुळे विजय यांनी आपण ‘सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री’ असल्याचा संदेश दिला आहे.
