तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पदभार स्वीकारताच आपल्या कामाचा झंझावात सुरू केला आहे. पहिल्याच दिवशी सामान्यांच्या हिताचे मोठे निर्णय घेतले आहेत. शाळा, प्रार्थनास्थळे आणि बस स्थानकांपासून ५०० मीटरच्या परिघातील ७१७ सरकारी दारूची दुकाने बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर, आता त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिस्तीचा बडगा दाखवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी बॅनरबाजीला पूर्णविराम

मुख्यमंत्री विजय यांनी त्यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी वाढदिवस, कौटुंबिक कार्यक्रम किंवा कोणत्याही राजकीय उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी बॅनर, पोस्टर्स किंवा अडथळा निर्माण होईल असे कोणतेही साहित्य लावण्यास त्यांनी सक्त मनाई केली आहे.

पक्षाने ‘X’ (ट्विटर) वर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, “तमिळगा वेत्री कळघमची स्थापना तमिळनाडूच्या जनतेच्या कल्याणासाठी झाली आहे. जनतेला त्रास होईल असे वर्तन करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

नेत्यांचे भव्य कट-आउट्स आणि पोस्टर्समुळे शहरे विद्रूप होणे ही तमिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत मोठी समस्या आहे. अनेकदा कार्यकर्त्यांकडून स्वतःच्या नेत्याच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची उधळण करत सार्वजनिक जागा बळकावल्या जातात. विजय यांच्या या निर्णयामुळे केवळ वाहतुकीचा अडथळा दूर होणार नाही, तर राजकीय संस्कृतीत एक ‘स्वागतार्ह बदल’पाहायला मिळेल, अशी चर्चा आहे.

जर या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी झाली, तर तो केवळ तमिळनाडूसाठीच नाही, तर संपूर्ण देशातील राजकीय पक्षांसाठी एक आदर्श ठरू शकतो. सामान्य जनतेने या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे.