तमिळनाडू्च्या विधानसभा निवडणुकीत आपला करीश्मा दाखवणारे नेते जोसेफ विजय यांनी १० मे २०२६ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून जोसेफ विजय यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री विजय यांच्या कामाची देशभरात चर्चा होत आहे. असं असतानाच तमिळनाडूच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन एल’ची मोठी चर्चा सुरू असून लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एआयएडीएमकेचे (AIADMK) जवळपास १० आमदार आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीकेमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षांतर्गत वर्तुळात या संदर्भातील प्रक्रियेचा अनौपचारिकपणे ‘ऑपरेशन एल’ असा उल्लेख जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, टीव्हीके पक्षाचे नेते आणि एआयएडीएमकेच्या १० आमदारांमध्ये वाटाघाटींबाबत चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षातील जवळपास १० आमदार हे १५ ऑगस्टच्या आधी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊ शकतात आणि त्यानंतर ते टीव्हीके पक्षात प्रवेश करून पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरं जाऊ शकतात. या चर्चेत सहभागी असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की, “ही प्रक्रिया १५ ऑगस्ट पूर्वी पूर्ण होईल. तसेच पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.”

दरम्यान, तमिळनाडू्च्या विधानसभेत २३४ जागा आहेत, यातील ७ जागा सध्या रिक्त असल्यामुळे एकूण सदस्य संख्या २२७ वर आली आहे. सध्या टीव्हीकेचं संख्याबळ १०७ एवढं आहे. यातच एआयएडीएमकेचे माजी मंत्री सी.विजयभास्कर आणि एम.आर. विजयभास्कर यांनी काही दिवसांपूर्वीच आमदारकीचा राजीनामा देत टीव्हीकेत प्रवेश केला. त्यांच्याशिवाय अनेक माजी आमदारांनीही टीव्हीकेत प्रवेश केला. याआधी एआयएडीएमकेच्या चार आमदारांनी राजीनामे देऊन टीव्हीकेत प्रवेश केला होता. त्यामुळे विरोधी पक्षाचं संख्याबळ कमी झालं आहे, तर सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जवळ पोहोचण्यासाठी हालचाली करत आहे.

जोसेफ विजय यांना कोणत्या पक्षाचा पाठिंबा?

तमिळनाडूच्या निवडणुकीत जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने १०७ जागा जिंकल्या. मात्र, तरी टीव्हीके पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळे तमिळनाडूत काही दिवस सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर अखेर ‘सीपीआय-एम’ आणि काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतर जोसेफ विजय यांनी सरकार स्थापन केलं.