तमिळनाडूतील कोयंबतूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मानसिक आजारी आणि बेघर महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न भटक्या श्वानांमुळे हाणून पाडला गेला. श्वानांनी जोरजोरात भुंकत संशयित मुलावर हल्ला केला आणि त्याचा पाठलाग करत त्याला घटनास्थळावरून पळवून लावले. या प्रकरणी पोलिसांनी १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

मध्यरात्री महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

ही घटना कोयंबतूरच्या उत्तरेकडील थुडियालूर परिसरातील एनजीओ कॉलनीजवळील अशोकापुरम येथे मध्यरात्री घडली. पोलिस तपासानुसार, महिला रस्त्याच्या कडेला झोपली होती त्यावेळी आरोपी अल्पवयीन तिच्याजवळ गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले आहे.

कुत्र्यांनी केला आरोपीचा पाठलाग

महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न सुरू असतानाच परिसरातील काही भटके कुत्रे आक्रमकपणे भुंकू लागले. त्यानंतर त्यांनी मुलावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. मात्र, कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुत्रे वारंवार आरोपीच्या दिशेने धावत असल्याचे आणि तो जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेच्या तपासात उघड झाला प्रकार

विशेष म्हणजे, पोलिसांना सुरुवातीला या अत्याचाराच्या प्रयत्नाची माहिती नव्हती. परिसरातील एका छोट्या दुकानाला लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास करताना पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. त्याच वेळी त्यांना कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्रकार दिसला. फुटेज पाहिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू केला.

१६ वर्षीय संशयित ताब्यात

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे थुडियालूर पोलिसांनी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाची ओळख पटवली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेऊन बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे.

सोशल मीडियावर कुत्र्यांचे कौतुक

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर भटक्या कुत्र्यांच्या भूमिकेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. अनेकांनी कुत्र्यांनी महिलेचे संरक्षण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

प्राथमिक तपासानुसार, या घटनेत महिलेच्या शरीराला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. महिला मानसिक आजारी असून बेघर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.