तमिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; देशभर हळहळ

तमिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जनरल बिपीन रावत हे ‘एमआय-१७ व्ही५’ हेलिकॉप्टरने तमिळनाडूतील वेलिंग्टन येथील संरक्षण दलाच्या महाविद्यालयातील (डीएसएससी) कार्यक्रमासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १४ जण होते. कोईम्बतूरजवळील सुलूर हवाई तळावरून सकाळी ११.४८ वाजता उड्डाण घेतलेले हे हेलिकॉप्टर पाऊण तासात वेलिंग्टन येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच (१२.२२ वाजता)  ते निलगिरी   जिल्ह्यातील कट्टेरी-नांचपंचथ्राम येथे कोसळले.

स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून प्रशासनाला या दुर्घटनेची माहिती दिली. हेलिकॉप्टरला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न स्थानिकांनी केला. दुर्घटनेआधी हेलिकॉप्टर कमी उंचीवरून जात होते. जमिनीवर कोसळेपर्यंत हेलिकॉप्टरने पेट घेतला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कोसळत्या हेलिकॉप्टरमधून आगीने पेट घेतलेल्या अवस्थेत दोघांना खाली पडताना पाहिल्याचे पेरूमल या स्थानिक प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

अपघातस्थळी हेलिकॉप्टरचे अवशेष विखुरलेल्या अवस्थेत होते. पोलिसांसह घटनास्थळी दाखल झालेल्या लष्करी जवानांनी बवाचकार्य केले. या अपघातातील जखमींना वेलिंग्टन लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास बचावकार्य संपल्याचे जाहीर करून निलगिरीचे जिल्हाधिकारी एस. पी. अमृत यांनी हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. मात्र, जनरल रावत यांच्या प्रकृतीबाबत अस्पष्टता होती.

यादरम्यान दुर्घटनेबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. तसेच त्यांनी हवाई दलप्रमुखांना घटनास्थळी जाण्याची सूचना केली. सिंह यांनी रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांच्या मुलीशी चर्चा केली.

हवाई दलाने सायंकाळी ६ च्या सुमारास ट्वीट करून रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका आणि अन्य ११ जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वेलिंग्टन लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले.

या अपघातात रावत आणि त्यांच्या पत्नीसह ब्रिगेडीयर एल. एस. लिड्डेर, ले. कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पी. एस. चौहान, के. सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक, लान्स नायक बी. एस. तेजा, हवालदार सतपाल यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेतील रावत यांच्यासह १३ जणांच्या मृत्यूबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला.

संरक्षण दलांचे पहिले प्रमुख

जनरन बिपिन रावत हे भारतीय संरक्षण दलांचे पहिले प्रमुख (सीडीएस) होते. ३१ डिसेंबर २०१९ रोजी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी, ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ते लष्करप्रमुख होते.

चौकशीचे आदेश

हेलिकॉप्टर अपघात नेमका कसा झाला, याबाबत संदिग्धता असून, या प्रकरणी हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातस्थळी दाट धुके होते. मात्र, चौकशीतूनच अपघाताचे कारण कळू शकेल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे हवाई दलाने म्हटले आहे.

जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील इतरांचा मृत्यू दु:खद आहे. समर्पण आणि त्यागवृत्तीने त्यांनी देशसेवा केली. त्यांचे कार्य देशाच्या कायम स्मरणात राहील.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले. भारताने एक शूर सुपुत्र गमावला आहे. रावत यांनी समर्पण व शौर्याने चार दशके देशसेवा केली. त्यांच्या कुटुंबाबद्दल सहवेदना.

-रामनाथ कोविंद, राष्ट्रपती