निवडणूक लढवणाऱ्या ३,९९२ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून एडीआरने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, तमिळनाडूमध्ये ४०४ उमेदवारांविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या जवळपास चार हजार उमेदवारांपैकी १८ टक्के उमेदवारांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने सोमवारी यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला.
तमिळनाडूत २३ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी २३४ मतदारसंघांतून चार हजार ६००पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढवत असून त्यापैकी तीन हजार ९९२ उमेदवारांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यातील ७२२ (१८ टक्के) उमेदवारांनी त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्ह्यांची माहिती दिली आहे. त्यापैकी ४०४ उमेदवारांवर (१० टक्के) गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
२०२१च्या निवडणुकीत, विश्लेषण केलेल्या तीन हजार ५५९ उमेदवारांपैकी १३ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल होते. त्यापैकी सहा टक्के गुन्हे गंभीर स्वरूपाचे होते. सर्वाधिक गुन्हे अण्णाद्रमुकच्या उमेदवारांविरोधात (६९ टक्के), त्याखालोखाल टीव्हीके (४० टक्के) आणि द्रमुकच्या (४० टक्के) उमेदवारांविरोधात आहेत. कमी जागा लढवणाऱ्या भाजप (४८ टक्के), काँग्रेस, पीएमके आणि डीएमडीके यांच्या प्रत्येकी ५० टक्के उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, महिला आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगणाऱ्या कोणत्याही पक्षाने ३३ टक्के महिलांना उमेदवारी दिलेली नाही. सर्व मिळून केवळ ४४२, म्हणजे ११ टक्के महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शिक्षणाचा विचार करता, ४३ टक्के उमेदवारांनी पाचवी ते १२वीदरम्यान शिक्षण घेतले आहे. तर ४६ टक्के उमेदवार किमान पदवीपर्यंत शिकले आहेत. त्याशिवाय ३०१ उमेदवारांकडे पदवी आहे. ९५ उमेदवार ठार निरक्षर आहेत आणि ५६ उमेदवार केवळ साक्षर आहेत.
कोट्यधीशांच्या संख्येत वाढ
विश्लेषण केलेल्यांपैकी २५ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. सरासरी काढल्यास प्रत्येक उमदवाराकडे ५.१७ कोटींची मालमत्ता आहे, २०२१मध्ये हे प्रमाण १.७२ कोटी इतके होते. या ९८१ कोट्यधीश उमेदवारांपैरी २२ उमेदवार अब्जाधीश आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संख्या अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाची असून त्यांनी आठ अब्जाधीशांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे दोन, द्रमुकचे सात, अण्णाद्रमुकचे तीन तर पीएमके आणि एएमएमके या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी एक उमेदवार अब्जाधीश आहेत. याशिवाय तीन अपक्षांसह चार उमेदवारांनी शून्य मालमत्ता जाहीर केली आहे.
