Tamil Nadu Election Result 2026 Thalapathy Vijay: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. दुपारनंतर आता सर्व राज्यातील चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपा तर तमिळनाडूत थलपथी विजय यांचा पक्ष विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. थलपथी विजय यांचा टीव्हीके तमिळनाडूमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. थलपथी यांचा विजय आश्चर्यकारक असला तरी, बिहारमधील जनसुराज्यचे प्रमुख आणि प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी वर्षभरापूर्वीच विजय यांच्या विजयाचे भाकीत केले होते. त्यावेळचा प्रशांत किशोर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीव्हीके १०६ जागांवर आघाडीवर

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, २३४ पैकी १०६ जागांवर टीव्हीके आघाडीवर आहे. एडीएमके ५५ तर डिएमके पक्ष ५४ जागांवर आघाडीवर आहे. विजय थलपती विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये थलपथी विजय यांचा निवडणूक प्रचार सुरु असताना प्रशांत किशोर यांनी एक वक्तव्य केले होते. “इथले बरेच लोक एम.एस. धोनीला ओळखतात. तमिळनाडूमध्ये माझ्यापेक्षा जास्त लोकप्रियता असलेला तो एकमेव बिहारी आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा मी तुम्हाला (टीव्हीके) जिंकण्यासाठी मदत करेन, तेव्हा मी तमिळनाडूमध्ये धोनीपेक्षा जास्त लोकप्रिय होऊन परत येईन,” असे किशोर म्हणाले होते.

प्रशांत किशोर यांचा अंदाज खरा ठरला

Axis My India वगळता कोणत्याही एक्झिट पोलमध्ये थलपती विजय यांच्या पक्षाला १०० हून अधिक जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली नव्हती. राज्यात पुन्हा स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डिएमके यांचे सरकार येईल असे बहुतांश एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तविण्यात आला होता. पण, प्रशांत किशोर यांनी पूर्वीच तमिळनाडूच्या राजकारणात थलपथी विजय यांच्या उदयाची क्षमता ओळखली होती.


Tamil Nadu Result 2026
Tamil Nadu Result 2026 (फोटो – Election Commission)

विजय यांचा पक्ष, टीव्हीके, सत्तेच्या शिखरावर पोहोचू शकेल का असे किशोर यांना विचारले असता त्यांनी, निश्चितच विजय सत्तेच्या जवळ पोहोचू शकतील असा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, त्यांनी यासाठी विजय यांना एकट्याने लढण्याची अट देखील ठेवली होती.

“धोनीपेक्षा अधिक प्रसिद्ध बिहारी”

“धोनी चेन्नई सुपर किंग्सला प्रत्येक वेळी जिंकवून देतो. इथे प्रत्येकजण त्याच्यासाठी घोषणा देत आहे. जर मी टीव्हीकेला जिंकवून दिले, तर तामिळनाडूमध्ये धोनीपेक्षा जास्त लोकप्रिय कोण असेल? मी की धोनी?” , असे टीव्हीकेच्या पहिल्या स्थापना दिनानिमित्त प्रशांत किशोर म्हणाले होते. त्यांचे हे विधान आता पुन्हा चर्चेत आले आहे. थलपती विजय निश्चित तमिळनाडूच्या निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला होता. एवढेच नव्हे तर हा व्हिडीओ सेव्ह करुन ठेवा आणि निकाल लागल्यानंतर पुन्हा दाखवा असे आव्हान देखील त्यांनी दिले होते. दरम्यान, तमिळनाडूतील निकाल पुढे येऊ लागल्यानंतर प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी करत असल्याची चर्चा समाज माध्यमांवर होऊ लागली आहे.