Thalapathy Vijay TVK Party: तमिळनाडू म्हटले की, द्रमुक पक्षांची आलटून पालटून सत्ता, असे समीकरण आजवर दिसत आले आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पक्षांनी तमिळनाडू राज्याची सत्ता मिळवली होती. भाजपा किंवा काँग्रेस सारख्या पक्षाला काही दशकांपासून तमिळनाडूत विस्तारता आले नव्हते. मात्र दाक्षिणात्य सुपरस्टार जोसेफ विजय चंद्रशेखर ज्याला विजय या नावाने ओळखले जाते. त्याच्या राजकारणातील एंट्रीमुळे आता द्रमुकच्या राजकारणाला पर्याय प्राप्त झाल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीत विजयचा ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष बनला आहे. त्याखालोखाल भाजपाचा मित्रपक्ष असलेला अण्णाद्रमुक असून सत्ताधारी द्रमुक पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. जेमतेम दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पक्षाने इतक्या कमी वेळात तमिळच्या राजकारणावर पकड कशी मिळवली? हे पाहू.
पक्षाच्या स्थापना सभेला प्रचंड गर्दी
२ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाची स्थापना केल्यानंतर विजयने विलुप्पुरम जिल्ह्यातील विक्रवंडी येथे २८ ऑक्टोबर रोजी आपल्या पक्षाची पहिली सभा घेतली होती. या सभेला सुमारे तीन लाख लोक जमले होते. पहिल्याच सभेत विजयने आपली राजकीय विचारधारा काय आहे? आपण कोणाविरोधात लढणार आहोत, हे स्पष्ट केले होते. भाजपाप्रणीत केंद्र सरकार आणि द्रमुकच्या नेतृत्वाखालील तमिळनाडू सरकारवर टीका करताना आपला पक्ष जातीविरोधी, धर्मनिरपेक्ष विचारधारा राखणारा असेल, हे त्याने स्पष्ट केले.
पेरियार यांचे देवांविरोधातील विचार नाकारून इतर विचारांचा स्वीकार
द्रविडीयम आणि राष्ट्रवाद हे आपल्या विचारधारेचे दोन महत्त्वाचे पैलू असल्याचेही विजयने या सभेत सांगितले होते. तसेच तमिळनाडूचे महापुरुष पेरियार यांचा देव-देवतांच्या विरोधातला विचार सोडून इतर द्रविडीयम विचारसरणी स्वीकारत असल्याचेही विजयने जाहीर केले होते.
तरूणांचा पक्ष म्हणून उदय
२०२४ साली राजकारणात येण्यापूर्वी विजयने विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलत असताना त्याने पैसे घेऊन मतदान करू नका, असे आवाहन केले होते. पक्षाची स्थापना केल्यानंतरही त्याची भिस्त ही तरुण मतदारांवर होती. यंदा प्रथम मतदान करणारे आणि तरुण मतदार यांना आकर्षित करण्यासाठी टीव्हीकेच्या जाहीरनाम्यात बेरोजगारांना सहाय्य, इंटर्नशिप कार्यक्रम, व्याजमुक्त कर्ज आणि युवकांसाठी सल्लागार परिषद अशा विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली होती.
तमिळनाडूमध्ये १२.५ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करत आहेत. तर २.२८ कोटी मतदार २० ते ४० वयोगटातील आहेत. एकूण मतदारांच्या संख्येपैकी हा तरूणांचा वर्ग जवळपास ४० टक्के इतका आहे. विजयच्या टीव्हीके पक्षाने नेमक्या याच गटाला लक्ष्य केले.
द्रमुकच्या वर्चस्वाला धक्का
स्वातंत्र्यानंतर १९५२ ते १९६७ या काळात काँग्रेसची तमिळनाडूमध्ये सत्ता होती. ज्येष्ठ नेते के. कामराज यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व होते. त्यानंतर १९६७ च्या निवडणुकीत तमिळनाडूमध्ये सी. एन. अन्नादुराई यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. १० वर्षांनी एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी द्रमुकमधून बाहेर पडून अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून या दोनच पक्षात आलटून पालटून तमिळनाडूचे नेतृत्व येत गेले.
१९६७ ते २०२१ पर्यंत द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) या पक्षांची तमिळनाडूमध्ये चलती राहिली. एमजीआर, एम. करुणानिधी, जे. जयललिता, ओ. पन्नीरसेल्वम आणि एम. के. स्टॅलिन या नेत्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते.
| निवडणूक वर्ष | सत्ता स्थापन करणारा पक्ष | मुख्यमंत्री (प्रमुख नेते) |
| १९६७ | द्रमुक (DMK) | सी. एन. अन्नादुराई, एम. करुणानिधी |
| १९७१ | द्रमुक (DMK) | एम. करुणानिधी |
| १९७७ | अण्णाद्रमुक (AIADMK) | एम. जी. रामचंद्रन |
| १९८० | अण्णाद्रमुक (AIADMK) | एम. जी. रामचंद्रन |
| १९८४ | अण्णाद्रमुक (AIADMK) | एम. जी. रामचंद्रन, व्ही. एन. जानकी |
| १९८९ | द्रमुक (DMK) | एम. करुणानिधी |
| १९९१ | अण्णाद्रमुक (AIADMK) | जे. जयललिता |
| १९९६ | द्रमुक (DMK) | एम. करुणानिधी |
| २००१ | अण्णाद्रमुक (AIADMK) | जे. जयललिता, ओ. पन्नीरसेल्वम |
| २००६ | द्रमुक (DMK) | एम. करुणानिधी |
| २०११ | अण्णाद्रमुक (AIADMK) | जे. जयललिता |
| २०१६ | अण्णाद्रमुक (AIADMK) | जे. जयललिता, ओ. पन्नीरसेल्वम, ई. के. पलानीस्वामी |
| २०२१ | द्रमुक (DMK) | एम. के. स्टालिन |
पाच दशकांहून अधिक काळ तमिळनाडूमध्ये द्रमुक वगळता इतर राष्ट्रीय पक्ष आणि तसेच प्रादेशिक पक्षांना आपले स्थान निर्माण करता आले नव्हते. तर तीन दशकांपासून माजी मुख्यमंत्री दिवंगत एम. करुणानिधी आणि दिवंगत जे. जयललिता या दोन प्रमुख नेत्यांभोवती राज्याचे राजकारण फिरत होते. एम. करुणानिधी यांच्यानंतर द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे २०२१ साली मुख्यमंत्री झाले होते. मात्र जोसेफ विजयच्या विजयामुळे तमिळनाडूला द्रमुक व्यतिरिक्त पर्याय मिळाल्याचे दिसत आहे.
