चेन्नई : अभिनेता-राजकारणी विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने तामिळनाडूच्या निवडणूक इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला. सत्ताधारी द्रमुक आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा त्यांच्या कोळथूर मतदारसंघातच धक्कादायक पराभव करून टीव्हीके सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. अण्णा द्रमुकला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

विजय आणि त्यांच्या पक्षाच्या नावावर अनेक विक्रम जमा झाले असून, ख्रिश्चन धर्मीय अल्पसंख्याक समुदायातून राज्याचे नेतृत्व करणारे विजय हे पहिले व्यक्ती ठरतील. विजय यांनी पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या दोन्ही मतदारसंघांतून विजय मिळवला आहे. १९६७ मध्ये तमिळनाडूत पहिले गैर-काँग्रेसी सरकार (द्रमुक) सत्तेवर आल्यानंतर, दोन्ही द्रविड पक्षांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तमिळनाडूच्या २३४ सदस्यीय विधानसभेत ‘टीव्हीके’ सर्वात मोठा पक्ष ठरण्याच्या मार्गावर आहे. २३ एप्रिल रोजी मतदान झाले होते आणि सोमवारी मतमोजणी पार पडली. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा त्यांच्या कोळथूर मतदारसंघात द्रमुकचे माजी आमदार व्ही. एस. बाबू यांनी ८,७९५ मतांच्या फरकाने पराभव केला. स्टॅलिन यांचा यापूर्वी १९९१ मध्ये पराभव झाला होता. उपमुख्यमंत्री उदयनिधी यांच्या मतदारसंघातही सुरुवातीला चुरस पाहायला मिळाली, मात्र अखेर त्यांनी चेपॉक-तिरुवल्लिकेनी येथून विजय मिळवला.

तमिळनाडूच्या विधानसभा निवडणूक निकालांनी नटांना राजकारणात यश मिळत नाही, हा जुना समजही मोडीत काढला. थलपती विजय आता एन. टी. रामा राव, एम. जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता यांसारख्या दिग्गज अभिनेता-नेत्यांच्या पंक्तीत सामील झाले आहेत.

सत्तेसाठी आकड्यांची जमवाजमव

  • टीव्हीकेच्या या अभूतपूर्व विजयानंतर पाण्युर येथील पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष केला. विजय यांनी सत्तेत समविचारी पक्षांना वाटा देण्याचे आश्वासन दिले असल्याने तामिळनाडूच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरू होण्याची अपेक्षा आहे. – काँग्रेस (५), मुस्लिम लीग (२), डावे पक्ष (४), व्हीसीके (२) आणि पीएमके (५) या पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन होऊ शकते. सरकार स्थापनेसाठी ११७ जागांची आवश्यकता असून, टीव्हीके आणि मित्रपक्ष या आकड्याच्या जवळ आहेत.

१५ मंत्र्यांचा पराभव

द्रमुक सरकारमधील ३४ पैकी १५ मंत्र्यांचा पराभव झाला. यामध्ये आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम, माहिती व तंत्रज्ञान मंत्री पीटीआर पलानीवेल थियागराजन, शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोय्यामोझी, उद्योगमंत्री टीआरबी राजा, एस. एम. नसर आदी मंत्र्यांचा यात समावेश आहे.