Analysis of how TVK Vijay CM post claim faced a technical hurdle in Tamil Nadu election results : जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. असे असले तरी विजयचा राजकीय क्षेत्रातील कमी अनुभव हा आता एक मोठी अडचण ठरताना दिसत आहे. राज्यपालांच्या भेटीदरम्यान सत्तास्थापनेचा दावा करताना हे प्रकर्षाने दिसून आले. राजकीय तज्ज्ञांच्या मते, राज्यपालांच्या भेटीदरम्यान टीव्हीकेने केलेली एक छोटीशी चूक विजयसाठी सर्वात मोठा अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे.

सामान्यतः निवडणूक निकालानंतर सर्वात मोठा पक्ष हा सत्तास्थापनेचा दावा करतो आणि त्यानंतर राज्यपालांकडून त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले जाते. यानंतर, त्या पक्षाला सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे लागते. मात्र तमिळनाडूमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. विजयच्या पक्षाला १०८ जागांवर विजय मिळाला आहे. विजयच्या टीव्हीके पक्षाला १०८ जागा मिळाल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात टीव्हीकेच्या जागा या १०७ आहे, कारण विजयला त्याने जिंकलेल्या दोन जागांपैकी एक जागा सोडावी लागणार आहे.

यामुळे टीव्हीकेला २३४ सदस्यांच्या सभागृहात बहुमताचा ११८ चा आकडा गाठण्यासाठी अजून ११ जागांची आवश्यकता आहे. विजयच्या पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला असून काँग्रेसचे ५ आमदार निवडून आले आहेत. यामुळे टीव्हीके आणि काँग्रेस मिळून संख्या ११२ इतकी झाली आहे.

नेमकी चूक काय झाली?

तज्ज्ञांच्या मते विजयच्या पक्षाने ६ मे रोजी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी जे पत्र सादर केले, त्यामध्ये टीव्हीके आमदारांच्या स्वाक्षऱ्यांबरोबरच काँग्रेसच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचाही समावेश होता. ही विजयच्या पक्षाकडून झालेली एक चूक आहे.

याऐवजी विजयने सुरुवातीला फक्त निवडून आलेल्या १०८ टीव्हीके आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेली यादी सादर करायला हवी होती. यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या टीव्हीकेचा नेता म्हणून त्यांचे स्थान पक्के झाले असते.

मात्र या यादीमध्ये काँग्रेसच्या आमदारांची नावे देण्यात आल्याने विजयने असा संकेत दिला की, एक युती सरकार सत्तास्थापनेचा दावा करत आहे. यामुळेच राज्यपालांनी त्यांना परत पाठवले असावे आणि सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११८ स्वाक्षऱ्यांसह पुन्हा परत येण्यास सांगितले असावे.

विजय यांची राज्यपालांबरोबची दुसरी भेटही निष्फळ ठरली. यावेळी तमिळनाडू लोकभवनकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे असे सांगण्यात आले की, सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत सिद्ध करण्यात विजय अपयशी ठरले आहेत.

“जर विजय यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून आपला दावा सादर केला असता, तर तो मान्य झाला असता,” अशी पोस्ट राजकीय विश्लेषक अमित कुमार सिंधी यांनी एक्सवर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

टीव्हीके पक्षाचा प्रमुख जोसेफ विजय हा अवघ्या ५१ वर्षाचा असून त्याने पहिली मोठी निवडणूक जिंकली आहे. टीव्हीके पक्षाकडे यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचाही अनुभव नाही. इतकेच नाही तर टीव्हीके आमदारांचे सरासरी वय हे फक्त ४४ वर्षे इतके आहे.

विजय यांच्या पक्षात राजकीय अनुभव असलेले सर्वात ज्येष्ठ नेते हे के.ए. सेंगोट्टैयन हे आहेत. नऊ वेळा आमदार राहिलेल्या सेंगोट्टैयन यांनी २०२५ मध्ये AIADMK सोडून टीव्हीकेमध्ये प्रवेश केला होता.