दिल्लीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कवट्या हाती घेऊन अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी मोर्चा काढला आहे. हे शेतकरी तामिळनाडूचे आहेत. त्यांनी हा दावा केला आहे की त्यांच्या हाती असलेल्या कवट्या या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आहेत. हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झाले असून आम्हाला शुक्रवारी संसदेत जाण्यापासून रोखले तर आम्ही नग्न मोर्चा काढू असाही इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

रामलीला मैदानावर आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांधले शेतकरी पोहचले आहेत. शु रामलीला मैदानावरच्या मोर्चामुळे आनंद विहार, निझामुद्दीन आणि बिजवासन रेल्वे स्टेशन या ठिकाणी गर्दी झाली होती. ऑल इंडिया किसान संघर्ष समितच्या शेतकऱ्यांचाही या मोर्चात सहभाग आहे. आम्ही पिकं घेतो तरीही पुरामुळे, किंवा दुष्काळामुळे आमचे नुकसान झाले आहे. सरकारने आम्हाला भरपाई दिली पाहिजे तसेच आमच्या समस्या आणि विवंचना जाणून घेतल्या पाहिजेत असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

२ ऑक्टोबरला भव्य शेतकरी मोर्चा दिल्लीत काढण्यात आला होता. जो सुरक्षा दलांतर्फे अडवण्यात आला त्यांच्यावर अश्रूधुराचा मारा करण्यात आला तसेच लाठीचार्जही करण्यात आला. इंडिया गेट या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आला होता मात्र तो अडवण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी कवटी मोर्चा काढण्याचे ठरवले आहे तसेच आम्हाला अडवण्यात आले तर आम्ही निर्वस्त्र होऊन मोर्चा काढू असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

आम्ही दोन हजार शेतकऱ्यांसह दिल्लीत दाखल झालो आहोत आता उद्या म्हणजेच शुक्रवारी आम्ही दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढणार आहोत असे दरभंगा येथील शेतकरी जामून ठाकूरने सांगितले. आता उद्या होणाऱ्या मोर्चात पोलिसांकडून बळाचा वापर होईल का? की शेतकऱ्यांना हा मोर्चा काढू दिला जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांनी बळाचा वापर केल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं त्या पार्श्वभूमीवर आता या मोर्चात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नापिकी, दुष्काळ, पूर या समस्यांना कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी देशभरात आत्महत्या केल्या आहेत. अशी वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून आम्ही हा मोर्चा काढतो आहोत. याआधी २०१७ मध्येही तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी अशाप्रकारे कवटी मोर्चा काढला होता. एप्रिल आणि जुलै महिन्यात तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा मोर्चा काढला होता. आता संसदेवर या प्रकारचा मोर्चा काढला जाणार आहे.