Tamil Nadu Firecrackers Factory Blast : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात रविवारी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, रविवारी विरुधुनगरमधील एका फटाक्याच्या कारखान्यात अचानक भीषण स्फोट झाला. यामध्ये किमान १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कशामुळे घडली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटलं की, “विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनापत्ती येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेक लोकांच्या मृत्यूची दुःखद बातमी अत्यंत वेदनादायक आहे. या घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेची माहिती कळताच मी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना सर्व आवश्यक त्या मदतीचे निर्देश दिले आहेत”, असं मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी म्हटलं.

युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

दरम्यान, विरुधुनगरमधील फटाक्याच्या कारखान्यातील भीषण स्फोट झाल्याच्या प्रकरणात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या स्फोटमुळे इमारतीचा काही भाग कोसळला असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांचा शोध आपत्कालीन पथकांकडून घेण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

पोलीसांकडून घटनेची चौकशी

विरुधुनगरमधील फटाक्याच्या कारखान्यातील भीषण स्फोट प्रकरणात आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ही घटना नेमकं कशामुळे घडली? याचा शोध आता घेतला जात आहे.