तमिळनाडूमध्ये स्वतंत्र राज्य ध्वजाची मागणी पुन्हा एकदा पुढं आली आहे. तमिळनाडूचे क्रीडा मंत्री आधव अर्जुन यांनी ‘राष्ट्रीय ध्वजाच्या बरोबरीचा’ स्वतंत्र राज्य ध्वज असावा, अशी मागणी केली आहे. क्रीडा मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वादाची मोठी ठिणगी पडली असून, भाजपानं यावर आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या सरकारवर टीका करताना ‘ही मागणी म्हणजे फुटीरतावादी मानसिकतेला खतपाणी घालण्याचा प्रकार’ असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. क्रीडा मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळं तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांनी १९७० मध्ये मांडलेला स्वतंत्र ध्वजाचा प्रस्ताव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘इंडिया टूडे’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
“राष्ट्रीय ध्वजाच्या दर्जाचा स्वतंत्र ध्वज हवा”, क्रीडा मंत्री नेमकं काय म्हणाले?
प्रस्तावित राज्य ध्वजाबाबत भूमिका मांडताना क्रीडा मंत्री आधव अर्जुन म्हणाले, “आपला स्वतःचा स्वतंत्र ध्वज असायला हवा. देशातील इतर अनेक राज्यांचेही स्वतःचे ध्वज आहेत. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सर्वात आधी हा ध्वज फडकवावा आणि राज्यातील प्रत्येक घरावर तो फडकवला जावा. आपल्याला आता असा ध्वज तयार करण्याची गरज आहे, जो भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या बरोबरीचा असेल.”
१८ जुलै रोजी साजरा होणारा ‘तमिळनाडू दिन’ आणि १ नोव्हेंबरचा भाषावार प्रांतरचना दिन या दोन्ही ऐतिहासिक प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी हा ध्वज फडकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यघटना काय सांगते?
गृह मंत्रालयानं २०१८ मध्ये संसदेत स्पष्ट केलं होतं की, भारतीय राज्यघटनेत कोणत्याही राज्यासाठी स्वतंत्र ध्वजाची तरतूद नाही. तसेच, ध्वज संहितेनुसार राष्ट्रीय ध्वजापेक्षा वर किंवा त्याच्या बरोबरीने एकाच काठीवर दुसरा कोणताही ध्वज फडकवण्यास सक्त मनाई आहे.
“तमिळ अस्मितेला स्वतंत्र ध्वजाची गरज नाही”, भाजपाची टीका
क्रीडा मंत्र्यांच्या या मागणीवर भाजपा नेते विनोद पी. सेल्वम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरून जोरदार निशाणा साधला. “तमिळ भाषेला स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी कोणत्याही वेगळ्या ध्वजाची गरज नाही. आपली संस्कृती आणि तमिळ ओळख भारताच्या ‘तिरंग्या’खाली कधीही लहान होत नाही. तमिळ आणि भारतीय या दोन्ही ओळखींचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. मग लोकांमध्ये असा कृत्रिम भेदभाव का निर्माण केला जातोय?” असा सवाल सेल्वम यांनी उपस्थित केला.
यासोबतच, भाजपाने क्रीडा मंत्र्यांना राजकीय वादात अडकण्याऐवजी राज्यातील तमिळ माध्यमाचे विद्यार्थी, तरुणांचा रोजगार आणि उद्योजकांसाठी ठोस योजनांवर भर देण्याचा सल्ला दिला.
