Latest updates on TVK Vijay Tamil Nadu Govt Formation and the unfolding political drama involving the Governor and BJP : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत सर्वाधिक १०८ जागा जिंकणाऱ्या तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हीके) नेते जोसेफ विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा बुधवारी केला. मात्र राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचे पुरावे मागितले आहेत. यानंतर आता भाजपाने तमिळनाडूचे राज्यपाल आर. व्ही. आर्लेकर यांच्या या निर्णयामध्ये आपली कुठलाही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आर्लेकर यांनी विजयच्या पक्षाकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा पाठिंबा असल्याबाबत शंका उपस्थित केली . यानंतर भाजपा नेत्याने त्यांच्या पक्षाची यात कोणतीही भूमिका नसल्याचे म्हटले आहे. तसेच तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) ने आपले बहुमत सिद्ध केल्यास राज्यपाल त्यांचा प्रस्ताव स्वीकारतील, असे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते नारायणन तिरुपती यांनी सांगितले.

“हा एक कोणलाही स्पष्ट बहुमत नसलेला निकाल आहे. टीव्हीकेकडे बहुमत नाही. त्यांना त्यांचे बहुमत सिद्ध करावे लागेल. टीव्हीके त्यांच्या शक्यता पडताळून पाहू शकतात. जर त्यांनी बहुमत सिद्ध केले, तर राज्यपाल घटनात्मकदृष्ट्या ते स्वीकारतील. राजभवन किंवा राज्यपालांच्या बाबतीत कोणताही गोंधळ नाही. ते संविधानानुसारच काम करतील,” असे त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

भाजपाला विरोध करत असल्याने विजयवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा तिरूपती यांनी फेटाळून लावला. “हा एक लोकशाही देश आहे. येथे निवडणुका लोकशाही मार्गाने पार होतात. टीव्हीकेच्या विजय यांच्याकडे जास्त जागा आहेत. सर्व काही लोकशाही पद्धतीनेच होईल. कोणी कोणावर दबाव कसा काय टाकू शकते? हे सर्व राजकीय विधाने आहेत. मला हे योग्य वाटत नाही. जे काही घटनात्मकरीत्या लागू होईल, तेच घडेल,” असे भाजपा नेत्याने यावेळी सांगितले.

तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून टीव्हीकेकडून इतर पक्षांबरोबर युती करण्याचे प्रयत्न सुरू असताना भाजपाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सोमवारी टीव्हीके पक्षाने एकूण २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता असून, सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना आणखी १० आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

दरम्यान काँग्रेसने टीव्हीकेला समर्थन दिले असल्याने विजयला पाठिंबा असलेल्या आमदारांमध्ये आणखी पाच आमदारांची भर पडली आहे. टीव्हीकेकडून व्हीसीके आणि डाव्या पक्षांकडे देखील पाठिंब्यासाठी चर्चा केली जात आहे.

काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांची संख्या ११३ वर पोहोचली. मात्र अजूनही त्यांना ५ आमदारांचा पाठिंबा हवा आहे. तसेच जोसेफ विजय हे स्वतः दोन ठिकाणी निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे त्यांना पुढे सहा आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल.

जोसेफ विजय यांनी दोन वेळा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. मात्र इतर पक्षांच्या पाठिंब्याचे पत्र आणि ११८ आमदारांच्या स्वाक्षरी असलेले कागदपत्र घेऊन येण्याचे निर्देश त्यांनी दिले. सत्ता स्थापनेनंतर सरकार स्थिर राहावे, शपथविधीनंतर ते लगेच कोसळू नये, असेही राज्यपालांनी म्हटल्याचे समोर येत आहे.