CM Vijay Govt Jobs Age Limit Relaxation: तमिळनाडू सरकारने विविध सरकारी पदांच्या थेट भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत तब्बल पाच वर्षांची सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी जाहीर केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी हा निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले.

शासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ही सवलत इतर ओबीसी प्रवर्ग, अतिमागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या घटकांसाठी आधीपासून लागू असलेल्या सवलतींव्यतिरिक्त लागू असेल. ही वाढीव वयोमर्यादा ३० ऑक्टोबर २०२६ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

कोणत्या पदांसाठी किती मर्यादा?

ग्रुप-१ सेवा (नागरी सेवा): खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वरून ३७ वर्षे करण्यात आली आहे, तर राखीव प्रवर्गासाठी ती ३७ वरून ४२ वर्षे करण्यात आली आहे.

ग्रुप-२ आणि २-अ सेवा: खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३० वरून ३५ वर्षे करण्यात आली असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा असणार नाही.

ग्रुप-४ परीक्षा: सर्वसाधारण उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३२ वरून ३७ वर्षे करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात वयोमर्यादा किती?

महाराष्ट्रात शासन सेवेतील गट अ ते गट ड मधील विविध पदांवर नियुक्तीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३३ आणि मागासवर्गीयांसाठी ३८ वर्ष इतकी होती. मात्र ही वयोमर्यादा २५ एप्रिल २०१६ च्या शासन आदेशानुसार वाढविण्यात आली होती. आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांनी वाढवून ३८ वर्ष तर मागासवर्गीय उमेदवारांसाठीही पाच वर्षांची वाढ करून कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे करण्यात आली आहे.

तमिळनाडू आणि महाराष्ट्राची तुलना करायची झाल्यास राज्यातील उमेदवारांना एक वर्ष अधिक मिळत आहे.

विजय सरकारचे लोककल्याणकारी निर्णय

सत्तेवर आल्यापासून विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोककल्याणकारी योजनांचा सपाटा लावला आहे. यापूर्वी सरकारने घरगुती ग्राहकांसाठी मोफत वीज मर्यादा दर दोन महिन्यांसाठी १०० युनिटवरून २०० युनिट केली आहे. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दल स्थापन करणे तसेच शाळा, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणांजवळ असणारी ७१७ सरकारी मद्यविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिक्षण क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या अल्पोपाहार योजनेचा विस्तार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांसाठी योजना

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सहकारी बँकांचे ७५ हजार रुपयांपर्यंतचे पीककर्ज पूर्णपणे माफ केले असून १ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरही सवलत जाहीर केली आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील १३.३४ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. याव्यतिरिक्त शासकीय रुग्णालयांत जन्मणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाला १ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि पात्र तरुणींच्या विवाहासाठी आर्थिक साहाय्य देणाऱ्या योजनांचीही प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

विजय सरकारने १७ ऑगस्ट रोजी आपल्या कार्यकाळाचे १०० दिवस पूर्ण केले. त्यानिमित्त ‘१०० दिवसांचा कारभार – पिढ्या घडवणारे सरकार’ हा प्रगती अहवाल सादर करत प्रशासनाने सुरुवातीच्या महिन्यांतील कामांचा आढावा जनतेसमोर मांडला होता.