Tamil Nadu jailbreak 17 prisoners escape triggers : तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील एका तुरुंगातून १७ अंडरट्रायल कैदी पळून गेल्याच्या घटनेनंतर तमिळनाडू सरकारने वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई केली आहे. यासोबतच, सर्व तुरुंगांमधील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री विजय यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
थेनी तुरुंग अधीक्षक नागेश्वरन यांना ३० ऑक्टोबरपासून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. दरम्यान, मदुराई मध्यवर्ती तुरुंगाचे अधीक्षक आर कृष्णराज यांची बदली करण्यात आली असून, त्यांची सालेम मध्यवर्ती तुरुंगाचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री विजय यांनी तुरुंग प्रशासनाला राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आणि कडक पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नऊ तुरुंग कर्मचाऱ्यांना निलंबित
२६ ऑक्टोबर रोजी थेनी जिल्ह्यातील थेक्कम्पट्टी उप-तुरुंगातून १७ न्यायप्रविष्ट कैदी पळून गेल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. या कैद्यांनी आजारी ५ूअसल्याचा बनाव केला, तुरुंग रक्षकांना ओलीस ठेवलं आणि चाव्या घेऊन पळ काढला. त्यानंतर शोध मोहीम राबवून सर्व १७ कैद्यांना पुन्हा पकडण्यात आलं. या तुरुंग फोडण्याच्या घटनेनंतर तमिळनाडूतील तुरुंग सुरक्षेचा व्यापक आढावा घेण्यात आला, यामध्ये निष्काळजीपणाबद्दल नऊ तुरुंग कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
राज्य सरकारने तुरुंगांमधील पाळत मजबूत करण्यासाठी, सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि पद्धतशीर त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.
