Udayanidhi Stalin FIR Trisha: तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तंजावर येथे कावेरी पाणी वाटपावरून सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांनी वादग्रस्त विधान केले. या विधानावर आता भाजपा आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षानेही जोरदार टीका केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी तमिळनाडू पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना चौकशीसाठी चेन्नईहून तंजावर येथे नेले जाणार असल्याचे सांगितले जाते. स्टॅलिन यांनी अंतरिम जामीन मिळवण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.
वाद कसा सुरू झाला?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तंजावर पोलीस ठाण्यात उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात सहा कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कावेरी पाणी प्रश्नावर आंदोलनात बोलत असताना स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यावर टीका केली होती. कावेरीतील तमिळनाडूच्या वाट्याचे पाणी मिळवून देण्यात अपयशी ठरल्याबद्दल जोसेफ विजय यांच्यावर आरोप होत आहेत.
उदयनिधी स्टॅलिन भाषण करत असताना उपस्थितांमधून त्रिशा, त्रिशा असा आवाज दिला गेला. यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी काही क्षण थांबून द्वय अर्थी विधान केले. या विधानावर आता राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. हे विधान अश्लिल आणि महिलांचा अवमान करणारे होते, असे सांगितले जात आहे.
टीव्हीकेची टीका
उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानानंतर जोसेफ विजय यांचा ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) आणि द्रमुक पक्ष आमनेसामने आले आहेत. टीव्हीकेचे नेते अधव अर्जुन यांनी उदयनिधी यांना ‘अश्लिल निधी’ अशी उपमा देत राजकारणाचा स्तर घसरवला असल्याची टीका केली. तसेच आपल्या विधानातून महिलांचा अवमान करत असल्याचीही टीका त्यांनी केली.
अण्णादुराई यांनी सुरू केलेली चळवळ उदयनिधी स्टॅलिन आपल्या अश्लिल आणि द्वय अर्थी विधानातून बदनाम करत आहेत, असाही आरोप अर्जुन यांनी केला. तसेच उदयनिधी यांच्या विधानातून महिलांबद्दलचा विकृत विचार दिसून येत आहे. तमिळनाडूमधील कोणतीही आई, बहीण आणि पालक सार्वजनिक जीवनात अशा भाषेला स्वीकारणार नाहीत, असेही ते म्हणाले.
भाजपाचीही टीका
टीव्हीकेप्रमाणेच भाजपानेही द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेतला. तमिळनाडूचे भाजपाचे मुख्य प्रवक्ते नारायण तिरुपती यांनी म्हटले की, उदयनिधी यांचे विधान अश्लील, अवमानकारक आणि सभ्य समाजाला शोभा देणारे नाही. त्यांना अटक करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
तमिळनाडू भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनीही या भाषणाची खिल्ली उडवली आहे. तर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष खुशबू सुंदर यांनी अभिनेत्री त्रिशाची बिनशर्त माफी मागावी, अशी सूचना उदयनिधी यांना केली आहे.
