चेन्नई: तामिळनाडूच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू असून ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे नवे सरकार अल्पायुषी ठरेल, असा दावा द्रमुक (DMK) प्रमुख एम. के. स्टालिन यांनी केला आहे. “राज्यातील विद्यमान सरकार कधीही कोसळू शकतं, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मध्यावधी निवडणुकांसाठी आत्तापासूनच सज्ज राहावं,” अशा स्पष्ट सूचना स्टालिन यांनी पक्षाच्या जिल्हा सचिवांना दिल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्टालिन यांनी पक्षाची तातडीची बैठक घेतली. तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात गेल्या ५९ वर्षांपासून द्रविडी पक्षांचे (DMK आणि AIADMK) वर्चस्व राहिले आहे. मात्र, जोसेफ विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेत दोन्ही पारंपरिक पक्षांना विरोधी बाकांवर बसवले आहे.

…तर विजय सरकार संकटात येणार!

सध्याच्या संख्याबळाचा विचार केला तर विजय यांच्या पक्षाकडे स्वतःच्या १०७ जागा आहेत. तर मित्रपक्ष काँग्रेसच्या ५ आमदारांसह हे संख्याबळ ११२ वर पोहोचते. सरकार स्थापनेसाठी विजय यांना द्रमुकच्या (DMK) ४ मित्रपक्षांनी (प्रत्येकी २ जागा) बाहेरून पाठिंबा दिला आहे. याशिवाय, गेल्या आठवड्यात झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी अण्णाद्रमुकच्या (AIADMK) २५ बंडखोर आमदारांनी विजय सरकारच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे सध्या विजय मुख्यमंत्री पदावर सुखरूप आहेत.

मात्र, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा द्रमुकचा अंदाज आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरून पाठिंबा देणारे मित्रपक्ष (VCK, CPI, CPM आणि IUML) कधीही पाठिंबा काढून घेऊ शकतात. त्यातच अण्णाद्रमुकच्या २५ बंडखोर आमदारांवर विधानसभा अध्यक्ष किंवा न्यायालयाकडून अपात्रतेची टांगती तलवार आहे. हे आमदार अपात्र ठरल्यास विजय सरकार अल्पमतात येईल आणि राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल.

‘२०२९ च्या लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभा होणार’

द्रमुकच्या पराभवानंतर निराश झालेल्या कार्यकर्त्यांना धीर देताना माजी मुख्यमंत्री स्टालिन म्हणाले, “हा पराभव तात्पुरता आहे. राज्यातील सध्याचे सरकार कधीही पडू शकते. त्यामुळे गाफील न राहता तयार राहा. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसोबतच तामिळनाडूत पुन्हा विधानसभा निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. आपण जोरदार पुनरागमन करू आणि पुन्हा एकदा विजय मिळवू.” सोमवारी कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्टालिन यांनी, “तामिळनाडूच्या राजकारणात ‘सूर्याचा’ (द्रमुकचे निवडणूक चिन्ह) अस्त कधीच होऊ शकत नाही,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

स्वतःच्या पराभवाची स्वीकारली जबाबदारी

या निवडणुकीत एम. के. स्टालिन यांना स्वतःच्या कोलाथूर मतदारसंघातून पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. यावर बोलताना, “पक्षाच्या या पराभवाची नैतिक जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो,” असे ते प्रांजळपणे म्हणाले.

यावेळी त्यांनी पक्षाला डिजिटल युगात बदलण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर अभिनेता विजय यांच्या पक्षाचे मोठे वर्चस्व आहे, हे अप्रत्यक्षपणे मान्य करत स्टालिन म्हणाले, “पूर्वी आपण चहाच्या टपऱ्यांवर जी राजकारण आणि समाजकारणाची चर्चा करायचो, ती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. पक्षाची डिजिटल उपस्थिती वाढवावी लागेल.”

पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी समिती

द्रमुकच्या या अनपेक्षित पराभवानंतर स्टालिन यांनी थेट जमिनीवर उतरून काम करण्याचे ठरवले आहे. पराभवाची नेमकी कारणे शोधण्यासाठी आणि जनतेची थेट भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांनी ३६ सदस्यांची एक विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती जनतेमध्ये जाऊन पक्षाची पकड कुठे सैल झाली, याचा अभ्यास करेल.

दुसरीकडे, द्रमुकच्या या दाव्यांवर मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, स्टालिन यांच्या विधानांमुळे सरकारला कोणताही फरक पडत नाही. आमच्याकडे पूर्ण बहुमत असून, हे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.