चेन्नई : तमिळनाडूत सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नसून, ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाचे अध्यक्ष विजय यांनी गुरुवारी पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला निमंत्रित करावे, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली. मात्र, बहुमतासाठी ११८ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र दाखवल्यावरच सत्तेसाठी पाचारण करू, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. त्यामुळे विजय यांना आता डावे पक्ष आणि अन्य लहान पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे.
विजय यांच्या ‘टीव्हीके’कडे १०८चे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या पाठिंब्यामुळे ते ११३ वर जाईल. मात्र, विजय हे दोन ठिकाणी निवडून आले असल्याने ११२ हेच संख्याबळ गृहीत धरले जाईल. त्यामुळे गुरुवारी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी गेलेल्या विजय यांना राज्यपालांनी परतवून लावले. ‘टीव्हीके’ पक्षाकडे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही, असे राज्यपालांनी विजय यांना स्पष्ट केल्याचे लोकभवनाने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राज्यपालांच्या या भूमिकेवर काँग्रेससह डाव्या पक्षांनी टीका केली आहे तर, आर्लेकर याप्रकरणी नियमांनुसारच पावले उचलतील, असे भाजपने म्हटले आहे.
विजय यांच्यासह दोन-तीन मंत्र्यांचा शपथविधी उरकून महिनाभरात विधानसभेत बहुमत सिद्ध करता येईल, अशी ‘टीव्हीके’ची भूमिका होती. मात्र, आता त्यांना आधी आकड्यांची जुळवाजुळव करावी लागेल. ‘टीव्हीके’ नेते सी.टी.आर. निर्मल कुमार यांनी गुरुवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) राज्य सचिव एम. वीरपांडियन आणि ‘माकप’चे राज्य सचिव पी. षणमुगम यांची भेट सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याची मागणी केली. तसेच ‘विदुथलाई चिरुथाईगल काची’ (व्हीसीके) या दोन सदस्य असलेल्या पक्षाकडेही पाठिंबा मागण्यात आला. मावळत्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या या द्रमुकच्या मित्रपक्षांनी गुरुवारी एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली. ‘द्रमुक’चे तीनही मित्रपक्ष ‘टीव्हीके’च्या विनंतीवर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी स्वतंत्रपणे भेटतील, असे ‘व्हीसीके’ प्रमुख थोल थिरुमावलवन यांनी बैठकीनंतर सांगितले.
काँग्रेस-भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप
– तमिळनाडूमध्ये विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण देण्यावरून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. एका माजी भाजप नेत्याला राज्यपाल बनवून तमिळनाडूत सर्वाधिक जागा जिंकलेल्या ‘टीव्हीके’चा सत्ता स्थापन करण्याचा हक्क भाजप नाकारत आहे, असा आरोप काँग्रेस खासदार एम. पी. माणिकम यांनी केला.
– राज्यपाल कायद्यानुसार आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षाला इतर पक्षांनी किंवा निवडून आलेल्या सदस्यांनी दिलेला पाठिंबा समाधानकारक आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी राज्यघटनेच्या अनुच्छेद १६४ अन्वये राज्यपालांवर असते, असे प्रत्युत्तर भाजप प्रवक्ते नारायणन थिरुपती यांनी दिले.
द्रमुकचा काँग्रेसविरोधात ठराव
’तमिळनाडूत काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर टीका करणारा ठराव ‘द्रमुक’चे अध्यक्ष आणि मावळते मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमदारांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. भाजप अनेक राज्यांमध्ये जे करते, तेच काँग्रेसने तमिळनाडूमध्ये आमच्याबरोबर केले. काँग्रेस पक्षाने आपले जुने स्वरूप बदललेले नाही.
’द्रमुकप्रणीत आघाडीत काँग्रेसला एक राज्यसभेची जागा आणि २८ विधानसभा जागा देण्यात आल्या होत्या. आघाडीतील सदस्यांच्या मेहनतीने मिळवलेल्या विजयाचा अवमान करून काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिला,’ असे या ठरावात म्हटले आहे.
लोकभवनाबाहेर आंदोलन
राज्यपाल अर्लेकर यांनी टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी टीव्हीके कार्यकर्त्यांनी गुरुवारी लोक भवनाबाहेर निदर्शने केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
