Full Forms and Meanings of Tamilnadu Political Parties Name : ‘द्रविडीयन चळवळ’ (Dravidian Movement), सामाजिक न्याय आणि प्रादेशिक अस्मितेभोवती फिरणाऱ्या तमिळनाडूतील राजकारणाकडे अवघ्या देशाचं कायमच लक्ष राहिलं आहे. भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत तमिळनाडूचे राजकारण वेगळे ठरते, कारण येथे १९६७ पासून राष्ट्रीय पक्षांना (काँग्रेस किंवा भाजप) सत्ता मिळवता आलेली नाही. त्यामुळे इथलं राजकारण जितकं चर्चेत राहिलं, तितकंच येथील पक्षांची नावंही चर्चेत राहिली. या राज्यातील पक्षांची संक्षिप्ते रुपे (शॉर्ट फॉर्म) सर्वाधिक वापरली जातात. पण या संक्षिप्त रुपांचं दीर्घ रुप (Full Form) काय आहे? त्या नावांचा नेमका अर्थ काय होतो हे आज आपण पाहूयात.

TVK – अभिनेता सी. जोसेफ विजय यांनी स्थापन केलेल्या या पक्षाचं नाव तमिळगा वेत्री कळघम असं आहे. तमिळगा म्हणजे तमिळ लोकांची भूमी. तर वेत्री म्हणजे विजय आणि कळघम म्हणजे पक्ष, संस्था किंवा संघटना. म्हणजे तामिळनाडूच्या कल्याणासाठी स्थापन केलेला पक्ष म्हणजे टीव्हीके असा त्याचा अर्थ होतो.

DMK – सी. एन. अण्णादुराई यांनी १७ सप्टेंबर १९४९ रोजी स्थापन केलेल्या या पक्षाचं नाव आहे द्रविड मुन्नेत्र कळघम. द्रविड म्हणजे दक्षिण भारतातील मूळ संस्कृती आणि लोक. मुन्नेत्र म्हणजे प्रगती, विकास किंवा उत्कर्ष तर, कळघम म्हणजेच संघ, संस्था.

AIADMK – अभिनेते आणि दिग्दर्शक एम. जी. रामचंद्रन यांनी १९७२ साली स्थापन केलेल्या पक्षाचं पूर्ण नाव आहे ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम. पक्ष स्थानिक पातळीपर्यंत न राहता देशभर विस्तार व्हावा म्हणून एमजीआर यांनी पक्षात ‘ऑल इंडिया’चा समावेश केला. तर, ‘डीएमके’मधून बाहेर पडल्यानंतर रामचंद्रन यांनी अण्णादुराई यांच्या आदरप्रित्यर्थ अण्णादुराई यांचं नाव पक्षाच्या नावात ठेवलं. म्हणून या पक्षाचं नाव अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम.

NTK –एस. पी. आदितनार यांनी १९५८ मध्ये या पक्षाची स्थापना केली असून या पक्षाचं नाव नाम तमिळर कची आहे. हा तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये सक्रिय असलेला एक प्रमुख तमिळ राष्ट्रवादी (Tamil Nationalist) राजकीय पक्ष आहे. ‘नाम’चा अर्थ आम्ही होतो, तर तमिळर म्हणजे तमिळ लोक आणि कची म्हणजे राजकीय पक्ष. म्हणजेच तमिळ लोकांचा राजकीय पक्ष या अर्थाने या पक्षाला नाम तमिळर कची हे नाव देण्यात आलं.

PMK – डॉ. एस. रामदास यांनी १६ जुलै १९८९ रोजी या पक्षाची स्थापना केली असून पट्टाळी मक्कळ कची असं या पक्षाचं नाव आहे. पट्टाळी मक्कळ कची या तामिळ नावाचा मराठीत थेट अर्थ श्रमकरी लोकांचा पक्ष किंवा कामगार जनता पक्ष असा होतो. ‘पट्टाळी’चा अर्थ श्रमकरी, कष्टकरी असा आहे. तर, मक्कळ म्हणजे लोक किंवा जनता आणि कची म्हणजेच राजकीय पक्ष.

VCK – १९८२ साली तमिळनाडूमधील मदुराई येथे एम. मलालचामी यांनी ‘दलित पँथर्स इयक्कम’ (DPI) या नावाने एका सामाजिक चळवळीची स्थापना केली होती. १९८९ मध्ये संस्थापक मलालचामी यांच्या निधनानंतर थोल. थिरुमावलावन यांनी या चळवळीची धुरा सांभाळली. त्यानंतर १९९९ मध्ये या चळवळीचे अधिकृतपणे ‘विदुथलाई चिरुथाईगल कची’ (VCK) या राजकीय पक्षात रुपांतर झाले आणि पक्षाने पहिल्यांदा निवडणूक लढवली. विदुथलाई म्हणजे मुक्ती, स्वातंत्र्य किंवा सुटका, तर चिरुथाईगल म्हणजे बिबट्या तर कची म्हणजेच राजकी पक्ष.