तमिळनाडूच्या राजकारणातील उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाहीये. मुख्यमंत्री विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ टीव्हीके पक्षाने आता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या AIADMK ला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. AIADMK च्या चार माजी मंत्र्यांसह द्रमुकच्या एका माजी आमदाराने शुक्रवारी अधिकृतपणे ‘टीव्हीके’ पक्षामध्ये प्रवेश केला. यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत.

दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश

AIADMK च्या दिवंगत नेत्या जे. जयललिता आणि इडप्पाडी पलानीस्वामी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले एम. सी. संपत, एन. आर. शिवपथी, कादंबूर सी. राजू आणि उडुमलाई के. राधाकृष्णन यांनी ‘टीव्हीके’चा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्यासोबत द्रमुकचे माजी आमदार जे. करुणानिधी यांनीही मुख्यमंत्री विजय यांच्या पक्षात प्रवेश केला. तामिळनाडूचे विद्यमान मंत्री एन. आनंद आणि आधव अर्जुना यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

‘५० टक्के नेते आमच्यासोबत’- आधव अर्जुना यांचा खोचक टोला

नेत्यांच्या या पक्षप्रवेशानंतर ‘टीव्हीके’चे नेते आधव अर्जुना यांनी AIADMK चे सरचिटणीस पलानीस्वामी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते मिश्कीलपणे म्हणाले, “AIADMK मधील ५० टक्के नेते आधीच आमच्या पक्षात सामील झाले आहेत, यासाठी मी पलानीस्वामी यांचे आभार मानतो.”

अर्जुना पुढे म्हणाले की, जयललिता यांच्या निधनानंतर केवळ मुख्यमंत्री विजय यांनीच AIADMK च्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सन्मानाने एकत्र आणले आहे. आमचा पक्ष द्रमुकचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांच्या खऱ्या अनुयायांचेही स्वागत करण्यास तयार आहे. ‘टीव्हीके’मध्ये अंतर्गत गटबाजी किंवा हेवेदावे नसून, सर्वजण आदराने एकत्र काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

AIADMK मधील संकट गडद

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने सत्ता गमावली असली, तरी सर्वात मोठा फटका AIADMK ला बसला आहे. निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या AIADMK मधून सातत्याने बडे नेते बाहेर पडत आहेत. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

यापूर्वी पक्षाच्या २५ बंडखोर आमदारांनी पक्षाचा व्हिप धुडकावून विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले होते. त्यापैकी ४ आमदारांनी नंतर राजीनामा देऊन ‘टीव्हीके’मध्ये प्रवेश केला. याशिवाय २९ मे रोजी चेन्नईत तब्बल ३०० पेक्षा जास्त AIADMK कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला होता, ज्यात माजी मंत्री वेल्लामंडी नटराजन आणि आनंदन यांचा समावेश होता.

२०२५ मध्येच पडली होती ठिणगी

AIADMK ला गळती लागण्याची सुरुवात २०२५ मध्येच झाली होती, जेव्हा दिग्गज नेते के. ए. सेंगोट्टायन यांनी निवडणुकीपूर्वी पलानीस्वामी यांची साथ सोडून विजय यांच्याशी हातमिळवणी केली होती. हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आणि सध्या ते विजय सरकारच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून कार्यरत आहेत. माजी मंत्र्यांच्या या ताज्या पक्षांतरामुळे मुख्यमंत्री विजय यांची राज्यातील पकड अधिक मजबूत झाली असून, पलानीस्वामी यांच्या समोरील अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.