तमिळनाडूच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अंतर्गत वादाचा सामना करणाऱ्या ‘एआयएडीएमके’ (AIADMK) पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा एडापड्डी पलानीस्वामी (EPS) यांच्याविरोधात बंड पुकारत AIADMK च्या तीन आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून, त्यांनी मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या ‘तमिळगा वेट्री कळघम’ (TVK) पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

मरागतम कुमारवेल, जयकुमार आणि सत्यभामा अशी या तीन आमदारांची नावे आहेत. या तिन्ही आमदारांनी तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष जे.सी.डी. प्रभाकर यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले असून, अध्यक्षांनी ते त्वरित मंजूरही केले आहेत.

एआयएडीएमकेच्या ‘कोंगु’ या बालेकिल्ल्याला खिंडार

काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते सी.व्ही. शन्मुगम यांच्या नेतृत्वाखाली AIADMK च्या ३० आमदारांनी मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’ सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर घडलेली ही घडामोड पलानीस्वामी यांच्यासाठी अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. राजीनामा दिलेले हे तिन्ही आमदार AIADMK च्या बंडखोर गटातील होते. विशेष म्हणजे, धारापुरम आणि पेरुंदुरई हे दोन्ही मतदारसंघ पश्चिम तामिळनाडूतील ‘कोंगु’ भागात येतात, जो AIADMK चा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्याला आता मुख्यमंत्र्यांच्या पक्षाने सुरुंग लावला आहे. राजीनामा दिल्यानंतर लागलीच या तिन्ही नेत्यांनी टीव्हीके (TVK) सरकारमधील मंत्री आधाव अर्जुन यांची भेट घेतली.

आमदार आणि त्यांचे मतदारसंघ:

  • मरागतम कुमारवेल: मदुरंतकम विधानसभा मतदारसंघ (चेन्नईजवळ)
  • सत्यभामा: धारापुरम विधानसभा मतदारसंघ
  • जयकुमार: पेरुंदुरई विधानसभा मतदारसंघ

व्हीप धुडकावून दिला होता पाठिंबा

१३ मे रोजी तामिळनाडू विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीदरम्यान AIADMK च्या २५ बंडखोर आमदारांनी पक्षाचा ‘व्हीप’ (अडचणीच्या वेळी पक्षादेश) धुडकावून मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारच्या बाजूने मतदान केले होते. आज राजीनामा दिलेले तिन्ही आमदार याच २५ बंडखोरांपैकी होते.

बंडखोर गटात फूट; ५ आमदार पुन्हा पलानीस्वामींच्या गोटात

एकीकडे ३ आमदारांनी राजीनामा दिला असताना, दुसरीकडे बंडखोर गोटात मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत ५ बंडखोर आमदारांनी पलानीस्वामी यांचे नेतृत्व पुन्हा स्वीकारत मूळ पक्षात घरवापसी केली आहे. यामध्ये आर्कोटचे आमदार एस.एम. सुकुमार यांचा समावेश आहे.

या राजकीय उलथापालथीमुळे पलानीस्वामी यांच्या पाठीशी असलेल्या आमदारांची संख्या आता २७ झाली आहे. तर दुसरीकडे, ३ आमदारांच्या राजीनाम्यामुळे आणि ५ आमदारांच्या घरवापसीमुळे बंडखोर गटाची ताकद २५ वरून थेट १७ वर घसरली आहे.

तामिळनाडू विधानसभेचे सध्याचे गणित

नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेते ते नेते बनलेल्या विजय यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाला सर्वाधिक १०८ जागा मिळाल्या होत्या. मात्र, बहुमताचा आकडा गाठता न आल्याने त्यांनी काँग्रेस, IUML, VCK आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. दुसरीकडे, AIADMK ला या निवडणुकीत अवघ्या ४७ जागांवर समाधान मानावे लागले होते.

‘अम्मांचे राज्य आणायचे आहे’; वेळुमणींचा नवा पवित्रा

दरम्यान, या संपूर्ण राजकीय नाट्याला शुक्रवारी एक वेगळेच वळण मिळाले. बंडखोर गटाचे ज्येष्ठ नेते एस.पी. वेळुमणी यांनी पक्षात फूट पाडण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले. “एडापड्डी पलानीस्वामी हेच आमचे नेते आहेत आणि दिवंगत मुख्यमंत्री जयललिता (अम्मा) यांचे सुवर्णकाळ परत आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले. तसेच, मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात बंडखोर नेत्यांना कोणतेही स्थान मिळाले नसले, तरी “आपल्याला किंवा शन्मुगम यांना नवीन सरकारमध्ये कोणतेही पद मिळवण्यात रस नव्हता,” असा दावाही वेळुमणी यांनी यावेळी केला. मात्र, असे असतानाही आज झालेल्या तीन आमदारांच्या राजीनाम्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात ‘पिक्चर अभी बाकी है’ हेच स्पष्ट होत आहे.