CM Joseph Vijay DMK MLA Radhakrishnan Arrested News: तमिळनाडूमध्ये एकेकाळी करुणानिधी आणि जयललिता यांच्यातील टोकाचे वैर पाहायला मिळाले होते. सत्तेत आल्यानंतर विरोधकांवर फौजदारी कारवाई करण्याचा तमिळनाडूचा वादग्रस्त राजकीय इतिहास राहिला आहे. त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती एका ताज्या प्रकरणामुळे आली आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या कारणावरून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिता आर. राधाकृष्णन यांना अटक करण्यात आली आहे.

अटकेची कारवाई टाळण्यासाठी अनिता राधाकृष्णन यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन देण्यास विरोध केल्यानंतर तुतीकुडी पोलिसांनी त्यांना अटक केली.

राधाकृष्णन हे तिरुचेंदूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच दक्षिण तुतीकुडी जिल्ह्याचे द्रमुक पक्षाचे सचिव म्हणूनही ते काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑथूर नगर पंचायतीच्या कार्यालयात काही कागदपत्रे तपासत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना तुतीकुडी जिल्हा अधीक्षक कार्यालयात आणले गेले. तिथे अतिरिक्त जिल्हा अधीक्षकांनी त्यांची चौकशी केली.

प्रकरण काय आहे?

ऑथूर शहराचे टीव्हीके पक्षाचे सचिव एस. सेल्वम यांनी दिलेल्या तक्रारीनंतर राधाकृष्णन यांच्यावर २३ जून रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. २० जून रोजी ऑथूर येथे झालेल्या द्रमुक पक्षाच्या सभेत राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्याबाबत अवमानकारक आणि चिथावणीखोर विधान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३५३ (२) नुसार गुन्हा दाखल केला.

मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी. के. इलंथिरैयन यांनी राधाकृष्णन यांच्या भाषणाचा भाषांतरित केलेला मजकूर वाचल्यानंतर त्यांचा अंतरिम जामीन फेटाळून लावला. न्यायाधीशांनी भाषणाच्या मजकूरावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार मुख्यमंत्र्यांबाबत अशी भाषा कशी काय वापरू शकतो.

ते काही सामान्य व्यक्ती नाहीत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पदाचा आदर ठेवू नये का? असाही प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. राधाकृष्णन यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, आमदारांचे भाषण जरी अपमानकारक असले तरी त्यामुळे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते लागू होत नाहीत. आमदारांच्या विधानातून दोन गटांमध्ये वैर निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

मात्र सरकारी वकिलांनी याचा विरोध केला. आमदार राधाकृष्णन यांनी केलेली विधाने ही खूपच अपमानास्पद आणि द्रमुक तसेच टीव्हीके पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणारी होती. राधाकृष्णन यांच्या अटकेनंतर महापालिका महापौर जेगन पेरियासामी यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन केले.