तमिळनाडूच्या राजकारणात सध्या प्रचंड संघर्ष पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ DMK नेते आणि तिरुचेंदूरचे आमदार अनिता राधाकृष्णन यांनी रविवारी मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि त्यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “हे सरकार पुढील ६ महिनेही टिकणार नाही,” असा दावा करत त्यांनी, DMK प्रमुख एम. के. स्टॅलिन पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून परततील, असा विश्वास व्यक्त केला.
दक्षिण तमिळनाडूमधील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राधाकृष्णन यांनी TVK चे ज्येष्ठ नेते आणि विल्लीवाक्कम् मतदारसंघाचे आमदार आधाव अर्जुन यांना थेट आव्हान दिले. “या सरकारचे आयुष्य आता फक्त ४ महिने उरले आहे. आधाव अर्जुन यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, मीही राजीनामा देतो. आम्ही तिरुचेंदूरमध्ये आमनेसामने लढू. हा आमचा बालेकिल्ला आहे, येथे आम्ही कोणाचाही पराभव करू शकतो,” अशी गर्जना राधाकृष्णन यांनी केली. तिरुचेंदूर हा मतदारसंघ गेल्या २५ वर्षांपासून राधाकृष्णन यांचा बालेकिल्ला राहिला आहे.
स्टॅलिन यांच्या पराभवावर भाष्य आणि मतदारांवर संताप
गेल्या निवडणुकीत DMK चा बालेकिल्ला असलेल्या कोलाथूर मतदारसंघात एम. के. स्टॅलिन यांचा पराभव झाला होता. DMK मधून TVK मध्ये गेलेल्या व्ही. एस. बाबू यांनी स्टॅलिन यांचा पराभव केला था. यावर बोलताना राधाकृष्णन यांनी स्टॅलिन यांची पाठराखण केली. “स्टॅलिन यांनी कोलाथूरचा विकास सिंगापूरसारखा केला. पण तिथले मतदार ‘नालायक’ ठरले,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी मतदारांवर टीका केली. तसेच, “आमचे ‘थलायवर’ नेते स्टॅलिन यांनी आता त्रिचीमधून निवडणूक लढवावी. पुढील ४ ते ६ महिन्यांत ते पुन्हा मुख्यमंत्री होतील,” असा दावाही त्यांनी केला.
तमिळनाडूत ऐतिहासिक सत्तांतर
अभिनेते ते नेते बनलेल्या जोसेफ विजय यांच्या TVK पक्षाने गेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. २३४ जागांपैकी १०८ जागा जिंकून त्यांनी DMK आणि AIADMK च्या ६२ वर्षांच्या सत्तेच्या मक्तेदारीला सुरुंग लावला. बहुमतासाठी अवघ्या १० जागा कमी असताना, त्यांनी काँग्रेस, डावे पक्ष आणि VCK यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. हे तिन्ही पक्ष पूर्वी DMK चे मित्रपक्ष होते. त्यानंतर विधानसभेत १४४ विरुद्ध २२ मतांनी विजय यांनी विश्वासदर्शक ठरावही जिंकला.
राधाकृष्णन यांच्या या वादग्रस्त विधानांवर अद्याप मुख्यमंत्री जोसेफ विजय किंवा आधाव अर्जुन यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या विधानामुळे तमिळनाडूतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
